‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत आरोग्य विभागासह, ग्रामपंचायती सज्ज
वार्ताहर / मौजेदापोली
शासनाकडून कोविड19 हा साथीचा रोग संपुष्टात यावा यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यातील एक भाग म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही कोरोना तपासणी मोहिम राबविली आहे. यासाठी दापोली आरोग्य विभागासह ग्रामीण भागातील ग्रामपंचायती देखील सज्ज होत आहे. तर काही ग्रामपंचायतींनी या तपासणीसाठी सुरूवात देखील केली आहे.
दापोली तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये 71 तर शहरी भागात 8 अशी पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकांमध्ये आशा सेविका, आरोग्यसेवक, सेविका, ग्रामपंचायतीने नेमलेले दोन स्वयंसेवक असणार आहेत. प्रत्येक पथकाकडे नियोजित गावे व घरे असणार आहेत. सध्यातरी कोणी विरोध दर्शविला नसला तरी असे विरोध होण्याची शक्यता दाट आहे. स्थानिक ग्रामपंचायतींनी स्वयंसेवक नेमलेले आहेत. या तपासणीत ते देखील सहभागी असणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी फार विरोध दर्शविणार नाहीत असा विश्वास आरोग्य विभाग व्यक्त करत आहे.
या तपासणीत ताप खोकला, सर्दी, श्वास घ्यायला त्रास होत नाही ना याची चौकशी केली जाणार आहे. तसेच ऑक्सिमशीन व थर्मामीटर गनच्या सहाय्याने तपासणी केली जाणार आहे. काही ग्रामपंचायतींनी तपासणीसाठी साहित्य जमा केलेला आहे. तर काही ग्रामपंचायतींची जमवाजमव सुरू आहे. गावात येणाऱया आरोग्य पथकाला सर्वतोपरी सहकार्य करावे तसेच काही कोविड संदर्भात आजार असल्यास आरोग्य विभागाला कळवावे असे दापोली आरोग्य विभागाकडून नागरीकांना आवाहन करण्यात आले आहे.