प्रतिनिधी / दापोली
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीचा शुभारंभ आज पार पडला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवदास चव्हाण यांना दापोली तालुक्यातील पहिली कोरोनाची लस टोचून या मोहिमेचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी उपजिल्हा रुग्णालय व आसूद प्राथमिक आरोग्य केंद्रातील शंभर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. ही लस स्नायूंमध्ये द्यायची असल्याने सर्वांच्या दंडावर इंजेक्शनद्वारे देण्यात येणार असल्याची माहिती डॉ भागवत यांनी दिली आहे.
दापोलीकरीता ११० लसीचे डोस प्राप्त झाले असून त्यातील दहा डोस बाजूला ठेवले जाणार आहेत. उपजिल्हा रूग्णालयातील ६४ तर आसूद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ३६ आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर अर्धातास रूग्णालयात बसवून ठेवले जाणार असून त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. २४ तासात काही झाल्यास त्यांना तातडीने उपजिल्हा रूग्णालयात दाखल होण्यास सुचना देण्यात आल्या आहेत. या कामासाठी ५ आरोग्य सेविका व सेवकांची टिम तयार करण्यात आली असून दोन सेविका डोस देणार असून तीन जण त्यांना मदत घेण्यात येत आहे. त्यातून एखाद्या कर्मचाऱ्याची लस घेण्याची इच्छा न झाल्यास त्याला ही लस दिली जाणार नसल्याचे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले.
यावेळी सभापती रउफ हजवानी, प्र. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. सुतार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत, डॉ. रामतीर्थ चौगुले, डॉ. स्वप्नील भोजने, डॉ. प्रदीप बनसोडे, व्हॅक्सिन ऑफिसर विश्वास गौरत, सुजित भागवत, साक्षी हांडे, स्नेहल गोफणे, अमिता रेवाळे, सेजल मळेकर, अनघा घाग, स्वेता सावंत यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.