व्हॉटसअॅप वापरकरत्यांची फसवणूक होण्याची शक्यता
वार्ताहर / मौजे दापोली
आता दापोलीत देखील व्हॉटसअॅपवर 25 लाखांच्या लॉटरीचे ऑडिओ, मेसेज येवू लागल्याने नागरीकांमध्ये संभ्रमावस्था आहे. परंतु हे मेसेजे फेक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोणीही अशा घटनांमध्ये बळी पडू नये असे आवाहन देखील पोलीसांनी केले आहे.
आपल्या मोबाईलला जे सिमकार्ड आहे, अर्थात आपण ज्या नंबरने व्हॉटसअॅप चालवत आहात या नंबरला 25 लाखांची लॉटरी लागली आहे. आपल्याला केबीसी या संस्थेकडून अभिनंदन, सोबत पाठविलेल्या पत्रकावरील नंबर मोबाईल मध्ये सेव्ह करा आणि ऑनलाईन फोन करा असे सांगणारा ऑडीओ व सोबत एक माहितीपत्र पाठविले जात आहे. या माहिती पत्रात एसबीआय बँकेचा लोगो असून त्याचबरोबर अमिताभ बचन यांचा फोटो देखील लावण्यात आला आहे. तसेच या सोबत लॉटरी नंबर देखील देण्यात आला आहे. त्याचबरोबर शासनाची मुद्रा असलेले काही शिक्के देखील मारण्यात आलेले आहेत. मात्र याबाबत एसबीआय बँकेत चौकशी केली असता तेथेही अशा कोणत्याच लॉटरी संदर्भात माहिती नसून ही फेक असल्याचे समोर येत आहे.
या ऑडीओसह पाठविण्यात आलेल्या पत्रकात राणा प्रताप सिंग असे नाव देत मोबाईल नंबर देण्यात आला आहे. मात्र या नंबरवर फक्त व्हॉटसअॅपपणे कॉल करा असे सांगितले जात आहे. 25 लाखांची लॉटरीचा संदेश येत असल्याने ग्रामीण भागांमध्ये ग्रामस्थ या लॉटरी संदर्भात चौकशी करत आहेत. मात्र हे फेक असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे नागरीक व ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी अर्थात व्हॉटसअॅप वापर कर्त्यांनी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय असे कोणतेही कॉल करू नये. यामुळे आपली फसवणूक होवू शकते त्यामुळे सावधान रहाण्याचे आवाहन दापोली पोलीसांकडून करण्यात आले आहे.
दापोलीसह जिल्ह्यात ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार वाढत आहेत. असे असले तरी फेक व्यक्तींच्या फोनला उत्तर देत हुशार असलेली माणसं देखील बळी पडत आहेत. कोणालाही कोणत्याही प्रकारची खाजगी माहिती, बँक खात्याची माहिती देवू नये यामुळे फसवणूक होत आहे. त्यामुळे सर्वांनी सावधानता बाळगणे गरजेचे असल्याचे दापोली पोलीसांकडून सांगण्यात आले.