प्रतिनिधी / दापोली
बेकायदेशीररित्या होणाऱ्या एलईडी फिशिंग, फास्टर बोटी व पर्ससीन नौकांच्या द्वारे होणाऱ्या फिशिंगच्या विरोधात दापोली मंडणगड व गुहागर येथील कोळी बांधवांनी सुरू केलेले साखळी उपोषण दुसऱ्या दिवशी मंगळवारी देखील सुरू होते. हे सर्व मच्छीमार बांधव दापोली तहसील कार्यालयासमोर सोमवारी सकाळी पासून साखळी उपोषणाला बसले आहेत.
सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवसात या उपोषण स्थळी सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी भेट दिली. शिवाय प्रशासनाच्यावतीने तहसीलदार वैशाली पाटील यांनी देखील उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली. मात्र जोपर्यंत ठाम निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार कोळी बांधवांनी व्यक्त केला आहे.
या साखळी उपोषणाला कोळी बांधवांना बरोबर महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे.