प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील बोरथळ, आडे फाटा, चाचवल, मुर्डी, चिखलतळे (आंजर्ले) या भागात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. शनिवारी सकाळी प्रवीण वाटेकर व पप्पू खोत यांना भर दिवसा बिबट्याने दर्शन दिले.
अनेक नागरिकांनी या भागात बिबट्याला दिवसा रस्त्यावर फिरताना पाहिले आहे. शिवाय गेल्या आठवड्यात हा बिबट्या आंजर्ले येथील सुप्रसिद्ध कड्यावरचा गणपतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिवसा नागरिकांना आढळून आला होता. यामुळे या भागातून प्रवास करताना सर्वांनी काळजी घ्यावी. तसेच वन विभागाने या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून लोकांना भय मुक्त करावे असे आवाहन आंजर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश जैन यांनी केले आहे.