वार्ताहर / मौजेदापोली
दापोली नगरपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आलेल्या जागा खरेदीच्या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. परंतु हाच ठराव शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी बहूसंख्येच्या जोरावर मंजूर केला आहे. यामुळे दापोली आता कचरा प्रकरणावरून वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
दापोली नगरपंचायतीचा घनकचरा प्रकल्प सर्वे नं. 43/3/1 पोचरस्ता व लॅन्डफिल्डरसाठी घनकचरा प्रकल्पालगत असलेली सिराज रखांगे यांचे व इतरांची जागा खरेदी करणेबाबत निर्णय घेणे या विषयावर चर्चा करण्यात आली. यामध्ये नगरसेवक रविंद्र क्षिरसागर यांनी दापोली नगरपंचायतीकडे घनकचरा प्रकल्पासाठी 6 एकर जागा असल्याने आपण दापोलीकरांचा पैसा का वाया घालविता आमचा जागा खरेदीला विरोध असल्याचे क्षिरसागर यांनी सभेला सांगितले. राष्ट्रवादीचे नगरसेवक खालीद रखांगे यांनी सिराज रखांगे यांची जागेजवळ अनेकांचे ले आऊट केलेले असून नगरपंचायतीला जर जागा हवी होती तर त्याची वृत्तपत्रात जाहीरात का दिली नाही. तुम्हाला रखांगे यांचीच जागा विकत घ्यायची आहे. ठरवून तुम्ही प्रस्ताव तयार केला आहे असे सांगितले.
या सर्व प्रकारला आपला विरोध असल्याचे नगरसेवक रखांगे यांनी सांगितले. नगरसेवक सचिन जाधव यांनी घनकचरा प्रकल्पाकडे जाण्यासाठी 11 मीटरचा डीपी रोड नगरपंचायतीच्या विकास आराखड्यात असल्याने रस्त्यासाठी ही खाजगी जागा खरेदी करण्याची गरज नसल्याची भूमिका घेतले व या ठरावला विरोध केला. भाजपच्या गटनेत्या नगरसेविका जया साळवी यांनी एकीकडे कोविड-19मुळे दापोली नगरपंचायतीकडे पैसे नसल्यामुळे सफाई कर्मचाऱयांना पगार देण्यासाठी पैसे नसतात. 80 गुंठे जागा घेण्यासाठी नगरपंचायतीकडे पैसे कुठून येणार आहेत असा प्रश्न उपस्थित करत या ठरावस त्यांनी देखील विरोध दर्शविला. परंतु शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांनी बहूमताच्या जोरावर जागा खरेदीचा ठराव मंजूर केला आहे.