ग्रामस्थांचे अतोनात हाल
वार्ताहर / मौजेदापोली
दापोली तालुक्यातील कोळथरे ग्रामपंचायतच्या हद्दीमधील गोवळेवाडीत जाणारा रस्ता जागा मालकांनी बंद केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, तहसिलदार, पंचायत समितीकडे तक्रार दाखल केली आहे. तरी देखील सदर रस्ता अद्याप वाहतुकीला मोकळा करण्यात आलेला नाही.
कोळथरे गोवळेवाडीकडे जाणारा रस्ता जागा मालकांनी सिमेंट पोल उभे करून अचानकपणे बंद केला आहे. त्यामुळे या वाडीत रहाणाऱ्या ग्रामस्थांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या पशासकीय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला असता त्यांनी वस्तुस्थिती मान्य केली. तसेच आपण याबाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागवले असल्याचे सांगितले. याबाबत जागा मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.