प्रतिनिधी / दापोली
दापोली नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना निधीअभावी पगार न दिल्याने दापोली भाजपच्यावतीने पुढील आठवड्यात भीक मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. याबद्दल बोलताना भाजप शहराध्यक्ष संदीप केळकर म्हणाले की दापोली नगरपंचायतीच्या ठेका पद्धतीने काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना दोन महिने पगार देण्यात आलेला नाही. आपण याबाबत नगरपंचायतमध्ये जाऊन नगराध्यक्ष यांना जाब विचारला. यावर नगराध्यक्षा यांनी निधी अभावी पगार देण्यात आलेला नसल्याचे कबूल केले.
शिवाय आपला याबाबत पाठपुरावा देखील सुरू असल्याचे त्या म्हणाल्या असे संदीप केळकर यांनी सांगितले. मात्र येत्या सोमवार पर्यंत जर या सफाई कर्मचाऱ्यांचा पगार दोन महिन्याचा थकीत पगार देण्यात आला नाही तर दापोली शहर भाजपच्यावतीने दापोली शहरात डबे घेऊन भीक मांगो आंदोलन करण्यात येईल असा इशारा संदीप केळकर यांनी नगर पंचायत प्रशासनाशी बोलताना दिला आहे.