शासनाच्या धोरणानुसार समिती स्थापन करण्याची मागणी
प्रतिनिधी / दापोली
पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भय निधी या पथ विक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेच्या अंमलबजावणीसाठी दापोली नगरपंचायतीने एक समिती स्थापन केली आहे. परंतु ही समिती शासनाच्या धोरणांना धरून नसल्यामुळे दापोलीतील अनेक नागरीकांनी विरोध दर्शविला आहे. शासनाच्या धोरणानुसार व नियमानुसार समिती स्थापन करावी अशी मागणी पथविक्रेत्या व नागरीकांमधून होत आहे.
शासनाकडून दिलेल्या आदेशानुसार समिती स्थापन करण्याचा अधिकार हा तेथील मुख्याधिकाऱ्यांना आहे. त्यांनी धोरणानुसार समितीत सदस्य घ्यायचे आहेत. परंतु या समिती घेण्यात आलेल्या दोन ते तीन सदस्यांवरून नाराजी व्यक्त होत आहे. या समितीत घेण्यात आलेल्या व्यापारी संघटना या नोंदणीकृत असणे गरजेचे आहे. परंतु एक सदस्य हा नोंदणीकृत समितीत नाही तर दुसऱ्या सदस्यावर दापोली पोलीस ठाण्यात तक्रारी असल्याचे समोर चौकशी दरम्यान समोर आले आहे. त्याचबरोबर वकील वर्गातून घेण्यात आलेल्या सदस्य हा २०१४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या समितीतील आहे. परंतु ही समिती पुन्हा कार्यरत करण्यात आलेली नाही. त्या समितीचा कार्यकाळ संपलेला आहे. यामुळे ही समिती नियमानुसार नसल्याचे देखील बोलले जात आहे.