एक वर्षाच्या सखोल चौकशीनंतर एस्टी विभागाचा निर्णय
वाहतूक नियंत्रक चौकशीत दोषी आढळून आले, 23 हजार 360 रूपयांचा अपहार
प्रतिनिधी / रत्नागिरी
बनावट शिक्का मारून जादा पैसे आकारणी करून एसटी पासाची विक्री करून 23 हजार 360 रूपयांचा अपहार प्रकरणी निलंबित असलेले राजापूरचे वाहतूक नियंत्रक अभिजीत बाकाळकर एसटी सेवेतून बडतर्प करण्यात आल्याची माहिती एसटीचे विभागीय वाहतूक अधीक्षक अनंत जाधव यांनी दिली. गतवर्षी हे प्रकरण उघडकीस आले होते आणि या प्रकरणाच्या चौकशीत बाकाळकर हे दोषी आढळले होते.
गतवर्षी राजापूर बसस्थानकात पास अपहार प्रकरण एस्टी विभागाच्या निर्दशनास आले होते. त्यावेळी बाकाळकर हे वाहतूक नियंत्रक करत होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुरूवातीला वाहतूक नियंत्रक बाकाळकर यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या चौकशीत बाकाळकर दोषी आढळून आल्याने त्यांना एस.टी सेवेतून बडतर्प करण्यात आले आहे.
राजापूर डेपोत वाहतूक नियंत्रक म्हणून अभिजित बाकाळकर कार्यरत होते. 1 एप्रिल 2019 रोजी या वाहतूक नियंत्रक बाकाळकर यांनी सवलतीचा विद्यार्थी पासात गैरव्यवहार केल्याचे विभागाला लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ निलंबित केले. बाकाळकर हे 40 रूपयांचा पास हे 400 रूपयाला बनावट शिक्का मारून विक्री करत होते. त्यामुळे काही लोकांनी याबाबत विभागाकडे तक्रार केली होती. या चौकशीअंती बाकाळकर हे दोषी आढळून आले. त्यांनी 23 हजार 360 रूपयांचा अपहार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना सेवेतून बडतर्प करण्यात आल्याचे रत्नागिरी विभागीय वाहतूक अधीक्षक जाधव यांनी दिली.