प्रतिनिधी / लांजा
रस्त्यात सापडलेले तब्बल दीढ लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र परत करणार्या लांजा तालुक्यातील व्हेळ सडेवाडी येथील दोन सख्या भावांच्या प्रामाणिकपणाचे तालुक्यातून कौतुक केले जाते आहे.
वासुदेव गुणाजी पाटील व महेश गुणाजी पाटील या दोन भावानी रस्त्यात सापडलेले दीड लाख रुपयाचे मंगळसुत्र संबंधित मालकाला परत केले. ऐन दिवाळी सणात दाखविलेल्या या प्रमाणिकपणाबद्दल व्हेळ येथील दोघा भावांवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
लांजा तालुक्यातील व्हेळ फाटा ते विलवडे रेल्वेस्टेशन रस्त्याने वासुदेव व महेश हे दोघे भाऊ आपल्या चारचाकी वाहनाने घरी निघाले होते. सायंकाळी ८ वाजता घरी जात असताना स्टेशनपासून अर्धा किमी रस्त्यामध्ये त्यांना एक सोन्याचे मंगळसूत्र सापडले. आजूबाजूला कोणीच माणसे दिसली नाहीत. घरी न जाता दोघांनीही अर्ध्या रस्त्यातून आपली गाडी स्टेशनकडे फिरवली. विलवडे रेल्वे स्टेशन गाठुन त्यांनी काही प्रवाशांना विचारणा केली. त्यांनतर स्टेशनमास्तर यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र कोरोनाची परिस्थिती असल्याने स्टेशन मास्तर यांना भेटण्यास मनाई केली जात होती. अखेर वासुदेव व महेश यांनी आपल्याला सोन्याचे एक मंगळसूत्र भेटले असून कोणाचे असेल त्याला स्टेशनच्या ध्वनिक्षेपाद्वारे माहिती द्यावी अशी विनंती केली. त्यानुसार विलवडे स्टेशन मास्तर यांनी प्रवाश्यांना सूचित केले. त्या क्षणी काशीराम जाणू यदृक या नावाच्या व्यक्तीने ते मंगळसूत्र माझे असल्याचे सांगितले. त्यानंतर मंगळसूत्राची खात्री करून त्या दोघां भावांना सापडलेले मंगळसूत्र मालक यदृक याला परत करण्यात आले. मंगळसूत्र तब्बल दीड लाख रुपये किमतीचे होते. मंगळसूत्र परत करणाऱ्या वासुदेव व महेश पाटील या दोघा भावासह कोकण रेल्वे विलवडे स्टेशन कर्मचाऱ्यांचे या मंगळसूत्र मालक यदृक याने आभार मानले. मंगळसूत्र प्रामाणिकपणे परत करणाऱ्या पाटील बंधू यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.