आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेत सिद्धी शिंदेला ९९.५७ पर्सेनटाईल
प्रतिनिधी / खेड
सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर नॅशनल अँप्टिट्यड इन आर्किटेक्चर ( नाटा ) व ( बी.आर्च ) प्रवेश परीक्षेत भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमधील १२ वी विज्ञान शाखेतील ५ विद्यार्थ्यांनी गुणांचा उच्चांक गाठला. आय.आय.टी., एन.आय.टी., एचपीए यासारख्या नामांकित महाविद्यालयांतील प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
गणित, आर्किटेक्चरल बुद्धिमत्ता, चित्रकला या तीन विषयांवर आधारीत परीक्षेत प्रशालेतील सिद्धी शिंदे हिने बी.आर्चमध्ये ९९.५७ पर्सेनटाईल तर नाटामध्ये २०० पैकी १६४ गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकावला. पार्थ वडके याने बी आर्चमध्ये ९८.७४ पर्सेनटाईल तर नाटमध्ये १०९ गुण प्राप्त करत द्वितीय, वरद महाडिक याने बी आर्चमध्ये ९६.६५ पर्सेनटाईल तर नाटामध्ये ११२ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
रिया पुसाळकर हिने बी.आर्चमध्ये ९४.४२ पर्सेनटाईल व नाटामध्ये १२१ गुण, नेहा मोदी हिने नाटामध्ये ८८.०५ गुण प्राप्त केले. या विद्यार्थ्यांना प्रा. रोहन खेडेकर, प्रा. मानसी देवघरकर, प्रा. आशुतोष मराठे, प्रा. वैभव नांदिस्कर, प्रा. आशुतोष बाजपेयी, गुरुप्रसाद देवघरकर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था चेअरमन बिपीन पाटणे यांच्याहस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ. अजित भोसले, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्यासह संस्था पदाधिकारी उपस्थित होते.