प्रतिनिधी / लांजा
लांजा शहरातील मधली कुंभारवाडी येथे भर लोकवस्तीत रानटी डुक्करांच्या शिकारीसाठी लावलेल्या तारेच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू ओढवल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
लोकवस्तीपासून नजदिक पाणी असलेल्या वहाळातील एका झाडाला लावलेल्या फासकीत अडकून मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला. जिल्हाभरात सध्या बिबट्याची दहशत असून नागरीकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, राजापूर या तालुक्यामधून बिबट्याच्या दहशतीच्या घटना घडल्या आहेत. लांजा तालुक्याच्या ग्रामीण भागासह, शहरातही बिबट्याने आपली दहशत माजवली आहे. येथील श्वान व पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. दरम्यान मंगळवारी शहरातील कुंभारवाडी येथे फासकीत मृत बिबट्या आढळून आला.
मंगळवरी सकाळी ६ .३० वाजण्याच्या दरम्यान कुंभारवाडी येथील गुरे चारायला गेलेल्या गुराख्याने रस्त्याच्या शेजारील वहाळातील एका झाडाला अज्ञात प्राणी अडकलेला पहिला. त्यांनी पुढे जाऊन पाहिले असता बिबट्या तारेच्या फासकीत अडकून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती लांजा वनविभागाला दिली. त्यानुसार वनविभागाचे कर्मचारी कुंभारवाडी येथे घटनास्थळी दाखल झाले. वहाळातील झाडला लावलेल्या तारेच्या फासकीत अडकलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात आले. घटनेचा पंचनामा करण्यात आला असता बिबट्याचे सर्व अवयव सुरक्षित होते. येथील नागरिक पुरुषोत्तम आत्माराम कुंभार यांच्या मालकीच्या जागेत अज्ञाताने रानटी डुक्करांसाठी फासकी लावली होती.
लोकवस्ती शेजारी असलेल्या जंगल भागात व वहाळात पाणी असल्याने रानटी प्राणी रात्रीच्यावेळी पाणी पिण्यासाठी येत असावेत. यावर दबा धरून राहिलेल्या अज्ञाताने डुक्कराच्या शिकारीसाठी तारेची फासकी लावली असावी. यामध्येच बिबट्याचा अडकुन मृत्यू झाला असल्याचा अंदाज वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी व्यक्त केला आहे. वहाळात झाडाला लावलेल्या फासकीत अडकलेल्या स्थितीत मृत अवस्थेत बिबट्या गुराख्यांना आढळून आला. बिबट्याच्या मानेभोवती तारेचा फास अडकला होता. फास अडकल्याने आपली सुटका करण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याने फास बिबट्याच्या मानेला बसून यामध्येच त्याचा मृत्य झाला. बिबट्या ३ वर्षाचा मादी जातिचा होता. बिबट्याची २१० सेंटीमीटर लांबी होती. बिबट्याला शवविच्छेदन करण्यासाठी रत्नागिरी झाडगाव येथे नेण्यात आले. त्याच ठिकाणी बिबट्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळी रत्नागिरी- लांजा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका लगड, लांजा वनपाल सागर पताडे, वनरक्षक विक्रम कुंभार आधी दाखल झाले होते.