सर्वेक्षण मोहीम गतीमान, ३३ जणांच्या स्वॅबच्या अहवालाकडे लक्ष
प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील वरवली-धुपेवाडी येथे तब्बल २७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संपर्कातील व्यक्तींची व्याप्ती मोठी असल्याने आरोग्य यंत्रणेने आणखी दोन वाड्यांमध्ये कन्टेनमेंट झोन जाहीर केला आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील ३३ जणांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले असून त्यांच्या अहवालाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
वरवली-धुपेवाडी येथील एका रूग्णाच्या संपर्कातील तब्बल २७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. कोरोना नियंत्रणात येत असतानाच घडलेल्या या घटनेने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. सुरूवातीला धुपेवाडी व गावठाण कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आला होता. मात्र, संपर्कातील व्यक्तींची संख्या जास्त असल्याने अंगणवाडी, देऊळवाडी येथेही कन्टेनमेंट झोन करण्यात आला आहे. या ४ वाड्यांमध्ये आरोग्य यंत्रणेने सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली असून यासाठी ३ पथके तैनात आहेत. सतर्क झालेल्या आरोग्य यंत्रणेने जनजागृतीची मोहीमही हाती घेतली आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील आणखी ३३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाकडे आरोग्य यंत्रणेसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
खेडमध्ये आणखी तिघे कोरोनाबाधित
तालुक्यातील वरवली-धुपेवाडी येथील २७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. वावेतील २ तर माणीतील एकास कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले. नव्या रूग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाबाधित संख्या १ हजार ५१६ वर पोहचली आहे. आतापर्यंत १ हजार ४०१ जणांनी कोरोनावर मात केली असून ७५ जणांचा मृत्यू झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात १६ दिवसात तब्बल ४४ कोरोना रूग्ण आढळले.