आरोग्य यंत्रणा हादरली, नव्या रूग्णांमुळे कोरोनाबाधितांची संख्या १५१३ वर पोहचली
प्रतिनिधी / खेड
खेड तालुक्यात कोरोना नियंत्रणात येत असतानाच ग्रामीण भागात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. वरवली – धुपेवाडीतील तब्बल २७ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा पुरती हादरली आहे. आरोग्य यंत्रणेने तातडीने तीन पथकांमार्फत सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली असून धुपेवाडी व गावठाणवाडीत कन्टेनमेंट झोन जाहीर केला आहे. कोरोना नियंत्रणातील पहिल्याच घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे. नव्या रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५१३ वर पोहचली आहे. ९ फेब्रुवारी रोजी वरवली – धुपेवाडीतील एक रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
या कोरोनाबाधिताच्या संपर्कातील ५६ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. रविवारी रात्री उशिरा आरोग्य विभागास अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार २७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न होताच आरोग्य यंत्रणा पुरती हादरली. तालुका वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रातोरात वरवली – धुपेवाडी येथे जावून परिस्थितीचा आढावा घेत रूग्णांना तातडीने उपचारार्थ कळंबणी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
वरवली – धुपेवाडीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये १४ पुरुष व १३ महिलांचा समावेश आहे. वरवली – धुपेवाडीची लोकसंख्या १५० आसपास असून धुपेवाडी व गावठाणवाडीत कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. लगतच्या ठाणकेश्वरवाडी, सुतारवाडी, देऊळवाडी, गावठाणवाडी, धनगरवाडी या वाड्यांमध्ये डोअर टू डोअर सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कोरोनाबाधितांच्या कुटुंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहे. या रूग्णांच्या अहवालाकडेच साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.