तहसिलदारांकडून समुद्रालगत गावांची पहाणी, ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट
वार्ताहर / मौजेदापोली
पुन्हा चक्रीवादळ अरबी समुद्रात घोंगावत असल्यामुळे दापोली तालुका प्रशासनाकडून सर्वच यंत्रणेला सज्ज रहाण्याच्या सूचना शुक्रवारी दापोलीच्या तहसिलदार वैशाली पाटील यांनी दिल्या आहेत. त्याबरोबर तहसिलदार श्रीम. पाटील यांनी समुद्रालगत गावांमध्ये जावून पाहणी करत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला देखील सूचना दिल्याच्या चौकशी दरम्यान समोर आले.
गेल्यावर्षी 3 जून 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हाहा:कार उडवला होता. तसाच प्रकार पुन्हा घडू नये, पुन्हा गावातील सुविधा ठप्प होवू नयेत या अनुषंगाने महावितरण, टेलिफोन, जेसीबी तसेच वादळात गरज भासणाऱया सर्वच घटकांनी तयार रहाण्याची सूचना संबंधीत यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. तसेच कोविड सेंटरमध्ये जेनरेटरची सुविधा उपलब्ध करून ठेवण्याचे देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून चक्रीवादळासमोर दोन हात करण्याची तयार सुरू आहे. तर स्थानिक ग्रामपंचायतींकडून देखील ग्रामस्थांना सूचना देण्यात येत आहेत.
यात मोबाईल चार्ज करा, सतत संपर्कात रहा, अत्यावशक गोष्टींचा साठा करू ठेवण्याच्या व घर पडीक असेल किंवा घराला धोका असेल अशा घरातील कुटुंबातील व्यक्तींनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याच्या देखील सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कोणीही कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व घाबरून जावू नये असे आवाहन तालुका प्रशासन व स्थानिक प्रशासन करत आहे.