प्रतिनिधी / गुहागर
गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे नदीकिनारी हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत अड्डा उध्वस्त केला आहे. या ठिकाणाहून १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दारू माफिया विश्वनाथ गोगो मयेकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधीक्षक डॉ.बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी रत्नागिरी जिल्ह्यात हातभट्टी निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विशेष मोहीम हाती घेतली आहे. यानुसार ही कारवाई करण्यात आली. चिपळूण ,गुहागर तालुक्यातील अनेक मोठ्या हातभट्टी दारू धंद्यांवर छापे मारून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गोवा बनावट दारूची विक्री होवू नये यासाठी विशेष नियोजन उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी केले आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील वेळणेश्वर येथे हातभट्टी दारू निर्मिती सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला खबऱ्या मार्फत मिळाली होती. यानुसार विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने धाड टाकली.
यावेळी गावठी दारू व रसायन असा मिळून १ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई भरारी पथकाचे निरीक्षक शरद जाधव, उपनिरीक्षक किरण पाटील, जवान मिलिंद माळी, सागर पवार, निनाद सुर्वे यांनी केली. याप्रकरणी विश्वनाथ (गोगो) मयेकर वय 33 वर्षे रा.वेळणेश्वर तालुका गुहागर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढे याच पद्धतीने हातभट्टी दारू व गोवा बनावट दारू धंद्यांवर कारवाया सुरू राहतील असा इशारा उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांनी दिला आहे. वेळणेश्वरमधील या दारू अड्ड्यावर गेल्या दोन महिन्यात तिसऱ्यांदा कारवाई झाली आहे यामुळे वारंवार तोच गुन्हा करणाऱ्या या दारू माफियांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.