प्रतिनिधी / लांजा :
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या लांजा तालुक्याचे सुपुत्र मुकेश भिकाजी जाधव यांना त्यांच्या रुण या गावी स्मृतिस्थळा ठिकाणी ग्रामस्थ व रत्नागिरी- लांजा पोलिसांच्यावतीने संचलन करून मानवंदना अर्पण करण्यात आली.
लांजा तालुक्यातील रुण हे मुकेश जाधव यांचे गाव असून ते मुंबई येथे होमगार्ड म्हणून सेवा बजावत होते.
सेवा बजावत असताना झालेल्या २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात मुकेश जाधव हे शहिद झाले. त्यांचा ११ वा स्मृतिदिन रुण बौद्धजन सेवा संघ, सावित्रीबाई फुले महिला मंडळ व सहयोग कला मंडळ मुंबई-ग्रामीण यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी रत्नागिरी व लांजा पोलीस स्थानकाचे कर्मचारी यांनी पुष्फहार व संचलन करून मुकेश जाधव यांना मानवंदना अर्पण केली. यावेळी रुण गावातील नागरिक उपस्थित होते. शहिद मुकेश जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते.