सार्वजनिक बांधकामच्या राज्य सचिवांचे आश्वासन, सुरक्षा अनामत रक्कम भरण्यास सूट देण्याचेही निर्देश
प्रतिनिधी / खेड
चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत विविध योजनेतील गेल्या ११ महिन्यांपासून थकलेली सर्व बिले येत्या दोन महिन्यातच अदा करण्यात येतील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्य सचिव देबडवाढ यांनी महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशन कोकण विभागाच्या शिष्ट मंडळाला दिले. नवीन कामाच्या विविध प्रविध प्रक्रियेदरम्यान भरावे लागणारे ईएमडी व सुरक्षा अनामत रक्कम भरण्यास सूट देण्याचेही निर्देश दिले आहेत.
सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देण्यात येणाऱ्या कामाची देयके गेल्या ११ महिन्यांपासून थकल्याने सुशिक्षित बेरोजगार अभियंते आर्थिक कोंडीत अडकले होते. बँकांचे हप्ते भरायचे कसे? असा यक्षप्रश्नही त्यांच्यासमोर उभा टाकला होता. थकलेल्या देयकांमुळे अर्थसहाय्य करणाऱ्या बँकांकडून कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत देखील देण्यात आल्याने सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येवून ठेपली होती. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनच्या कोकण विभागाच्या पदाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्य सचिव देबडवाढ, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता इंगवले यांच्यात चिपळूण येथील शासकीय विश्रामगृहात महत्वपूर्ण बैठक झाली. महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी थकीत देयकांबाबत गाहाणे मांडत उदभवलेल्या अडचणींबाबत सखोल चर्चा केली.
या चर्चेदरम्यान, थकीत बिलप्रश्नी तोडगा काढत येत्या दोन महिन्यातच सर्व थकीत देयके देण्यात येतील. सर्व देयके शंभर टक्के अदा होईपर्यंत नवीन कामाच्या निविदा प्रक्रियादरम्यान सुरक्षा अनामत रक्कम भरण्यापासून सूट देण्यात येईल. तसेच या रक्कमा पहिल्या देयकांमधून कपात करून घेण्याच्या सूचनाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता श्रीमती नाईक, चिपळूणचे कार्यकारी अभियंता मुळे यांना देण्यात आल्या. बैठकीस महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनचे कोकण विभाग अध्यक्ष विशाल शेले, जिल्हाध्यक्ष रणजित डांगे, खेड तालुकाध्यक्ष अमोल गुहागरकर, उपतालुकाध्यक्ष निखिल नलावडे आदी उपस्थित होते.