एच एनर्जी कार्यालयात आढळला पॉझिटिव्ह रुग्ण
स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष प्रशासनाची अधिकाऱ्यांना क्लिनचीट
प्रतिनिधी / गुहागर
गुहागर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना एच एनर्जी कार्यालयात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर स्वॅब दिलेले ३० अधिकारी घरी न राहता गेले दोन दिवस कामावर हजर आहेत. यामुळे कामगार वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिलेली पहावयास मिळत आहे.
गुहागर तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १५० च्या वरती गेली आहे. अशा मध्येच एच एनर्जी ही पाईपलाईनचे काम करणारी कंपनी सर्व कामगारांना घेऊन अंतिम टप्प्यातील काम करत आहे. शनिवारी या कंपनीतील कार्यालयामधील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आला.
या कर्मचाऱ्याच्या सर्वच अधिकारी संपर्क आल्याने शनिवारी एच एनर्जीचे तब्बल ३० अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथे जाऊन स्वॅब दिले होते. स्वॅब तपासणी अहवाल मिळेपर्यंत या सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या आस्थापनांमध्ये रहावयाचे आहे व तशा प्रकारे या सर्वांनी लिहून दिले आहे. मात्र हे अधिकारी आस्थापनांमध्ये न राहता रविवारी आणि सोमवारी सलग दोन दिवस कामावर हजर झाले आहेत.
या प्रत्येकाला स्वतंत्र वाहन असून वाहनचालकासहित सर्वांना बरोबर घेऊन हे काम करत आहेत. तेथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांजवळ त्यांचा संपर्क येत आहे. यामुळे शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कोरोना संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनात येत आहे. सदर घटनेबाबत तहसीलदार लता धोत्रे तसेच गुहागर पोलीस ठाणे येथे कळवून देखील त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही केली जात नाही. अधिकारी पदाचा गैरवापर करून प्रशासनालाही आपल्या बाजूने करणाऱ्या एच एनर्जी च्या हा अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का, जिल्हा प्रशासन याकडे लक्ष घालेल का, असा सवाल तालुक्यातील जनता करत आहे.