दसऱ्याच्या मुहूर्तावर सुशोभिकरणाचा शुभारंभ, ६ लाखाचा निधी खर्च
सुशोभिकरणाद्वारे पुतळ्याला पूर्णपणे संरक्षण
प्रतिनिधी / खेड
शहरातील तीनबत्तीनाका येथे वयाच्या १६ व्या वर्षी इंग्रज अधिकारी जनरल जॅक्शन याच्या डोक्यात गोळ्या घालून त्याचा वध करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे यांचा तीनबत्तीनाका येथे अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या चौकातील पुतळ्याच्या सुशोभिकरणावर ६ लाख १५ हजार १२७ रूपयांचा निधी खर्चुन करण्यात आलेल्या सुशोभिकरणामुळे चौकाला नवा साज चढला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर माजी आमदार संजय कदम व नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याहस्ते सुशोभिकरणाचा शुभारंभ झाला.
थोर क्रांतीकारक हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना खुदीराम बोस यांच्यानंतर सर्वात सशस्त्र क्रांतीकारक म्हणून गौरवले जाते. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी नाशिकचा कलेक्टर जनरल जॅक्शन याला गोळ्या घालून ठार केल्यामुळे १९ एप्रिल १९१० रोजी कोकणच्या आयनी गावच्या सुपुत्राला फाशी देण्यात आली. त्यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात आयनी गावाला मानाचे स्थान मिळाले. त्यांच्या शौर्याची गाथा पुढील पिढीला व्हावी, याकरिता तीनबत्तीनाका येथे हुतात्मा अनंत कान्हेरे यांचा अर्धाकृती पुतळा उभारून स्मृती उभ्या केल्या आहेत.
अर्धाकृती पुतळ्याबरोबरच सभोवताली चौकाची उभारणी करून परिसर सुशोभित करण्यात आला. २५ जानेवारी १९८७ रोजी हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला होता. या पुतळ्यामुळे हुतात्मा कान्हेरे यांच्या स्मृती सारेचजण जतन करत होते. मात्र, वर्षानुवर्षे हा अर्धाकृती पुतळा ऊन-पाऊस पावसाच्या झळा सोसत होता. यापार्श्वभूमीवर नगरपरिषदेने पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी ६ लाख १५ हजार १२७ रुपयांच्या निधीची तरतूद करत चौकाचे सुशोभिकरण करण्यात आले.
सुशोभिकरणाद्वारे हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या पुतळ्याला पूर्णपणे संरक्षण देण्यात आले आहे. या सुशोभिकरणामुळे चौकाला नवा साज चढला असून अनेकांची पावले याठिकाणी थबकत आहेत. सुशोभिकरणाच्या शुभारंभप्रसंगी उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, सेना गटनेते प्रज्योत तोडकरी, शहर विकास आघाडीचे गटनेते भूषण चिखले, नगरसेवक विश्वास मुधोळे, अजय माने, इलियास खतीब, तौसिफ खोत, नगरसेविका जयमाला पाटणे, सीमा वंडकर, माजी नगरसेवक राजेश संसारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष स. तु. कदम, कमर मुकादम, प्रसाद शेट, प्रथमेश खामकर, जयेश गुहागरकर, प्रदिप भोसले, किशोर साळवी आदी उपस्थित होते.