100 व्या कसोटीत 200 धावा जमवणारा पहिला फलंदाज
चेन्नई / वृत्तसंस्था
कर्णधार जो रुटने 9 तास किल्ला लढवत 218 धावांची ऐतिहासिक द्विशतकी खेळी साकारल्यानंतर इंग्लंडने भारताविरुद्ध येथील पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱया दिवसअखेर 8 बाद 555 धावांचा डोंगर उभारला. रुटने 377 चेंडूंचा सामना करत 19 चौकार व 2 षटकार वसूल केले. रुटला साजेशी साथ देणाऱया बेन स्टोक्सने देखील 118 चेंडूत 10 चौकार, 3 षटकारांसह 82 धावा फटकावल्या.
जो रुट आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा कसोटी इतिहासातील पहिला फलंदाज ठरला. पण, त्याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे भारतातील खेळपट्टय़ांवर फिरकी गोलंदाजीचा कसा बीमोड करावा, यासाठी भविष्यात त्याच्या या डावाकडे उत्तम संदर्भ म्हणून पाहिले जाईल. रुटने पहिल्या दिवशी कशी भक्कम पायाभरणी केली व दुसऱया दिवशी कशा पद्धतीने त्यावर कळस चढवण्याच्या दिशेने जोरदार आगेकूच केली, ते यात लक्षवेधी ठरले.
स्टोक्सचीही फटकेबाजी
शनिवारी दुसऱया दिवसाच्या खेळात बेन स्टोक्सने 118 चेंडूत 10 चौकार, 3 षटकारांसह 82 धावा फटकावल्या आणि रुटला समयोचित साथ दिली. या उभयतांनी चौथ्या गडय़ासाठी 124 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. इंग्लंडने 500 धावांच्या आसपास डाव घोषित केला नाही, त्यावेळी ते किमान 600 धावांच्या दिशेने प्रयत्नशील असतील, हे सुस्पष्ट झाले. गोलंदाजांना अतिशय प्रतिकूल स्थितीत असलेल्या खेळपट्टीवर इंग्लिश फलंदाजांनी सहजपणे वर्चस्व गाजवले. मागील 3 कसोटी सामन्यातील त्याचे हे दुसरे द्विशतक ठरले.
एकीकडे, रुट भारतीय गोलंदाजांचा सहज समाचार घेत असताना बेन स्टोक्सने देखील तोच कित्ता आणखी सफाईने गिरवला आणि यामुळे भारतीय संघाच्या जखमेवर जणू आणखी मीठ चोळले गेले. स्टोक्सने सातत्याने पुढे सरसावत भारतीय गोलंदाजांवर चांगलाच हल्ला चढवला आणि रुट बाद होत नसेल तर अन्य फलंदाजांकडे लक्ष केंद्रित करण्याचे विराटसेनेचे मनसुबेही पार उधळून लावले.
फिरकीपटूंचा समाचार
स्टोक्सने जोरदार हल्ला चढवला, त्यावेळी अनुभवी अश्विनच्या गोलंदाजीचीही लय बिघडून गेली. 132 धावात 2 बळी, असे पृथक्करण असलेल्या अश्विनच्या गोलंदाजीवरच रुटने पुढे सरसावत तडाखेबंद षटकार खेचत आपले द्विशतक अगदी थाटात साजरे केले.
इशांत उसळती गोलंदाजी करत असताना स्टोक्सने त्याच्याविरुद्ध आत्मविश्वासाने फटकेबाजी केली तर रुटने सावध पवित्र्यावर अधिक भर दिला. स्टोक्सने इशांतला ऑन-ड्राईव्ह व स्क्वेअर ड्राईव्हचे सलग दोन फटके लगावले, त्यावेळी विराटच्या चेहऱयावरील चिंतेच्या छटा ठळकपणे दिसून आल्या. इशांतने मात्र चेंडूचा वेग कायम ठेवत उत्तरार्धात 2 बळी घेतले. 52 धावात 2 बळी, असे त्याचे पृथक्करण राहिले. जसप्रित बुमराहला (2-81) सावधपणे खेळण्यावर इंग्लिश फलंदाजांनी भर दिला. शाहबाज नदीमला (2-167) मात्र अव्वल दर्जाच्या फलंदाजांना सामोरे जाताना कशी ससेहोलपट होते, याचा धडा मिळाला. नदीमच्या खात्यावर स्टोक्स, रुट असे फलंदाज बाद झाल्याची नोंद झाली असली तरी या उभयतांनी त्याचा घेतलेला समाचार इंग्लंडचे आणखी वर्चस्व अधोरेखित करुन गेला.
द्विशतकवीर रुटने मध्यमगती-जलद गोलंदाजीविरुद्ध तिशीच्या घरात तर फिरकी गोलंदाजांविरुद्ध सत्तरीच्या घरातील स्ट्राईक रेट नोंदवला. वॉशिंग्टन, नदीम यांनी रुटला सहजपणे एकेरी-दुहेरी धावाही घेऊ दिल्या. रुटने 130 धावा या एकेरी, दुहेरी व दुर्मीळ तिहेरी धावांमधून वसूल केल्या. याशिवाय, त्याने 19 चौकार व 2 षटकार फटकावले.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः रोरी बर्न्स झे. पंत, गो. अश्विन 33 (60 चेंडूत 2 चौकार), डॉम सिबली पायचीत गो. बुमराह 87 (286 चेंडूत 12 चौकार), डॅन लॉरेन्स पायचीत गो. बुमराह 0 (5 चेंडू), जो रुट पायचीत गो. नदीम 218 (377 चेंडूत 19 चौकार, 2 षटकार), बेन स्टोक्स झे. पुजारा, गो. नदीम 82 (118 चेंडूत 10 चौकार, 3 षटकार), ऑलि पोप पायचीत गो. अश्विन 34 (89 चेंडूत 3 चौकार), जोस बटलर त्रि. गो. इशांत 30 (51 चेंडूत 5 चौकार), डॉम बेस खेळत आहे 28 (84 चेंडूत 5 चौकार), जोफ्रा आर्चर त्रि. गो. इशांत 0 (1 चेंडू), जॅक लीच खेळत आहे 6 (28 चेंडूत 1 चौकार). अवांतर 37. एकूण 180 षटकात 8 बाद 555.
गडी बाद होण्याचा क्रम
1-63 (बर्न्स, 23.5), 2-63 (लॉरेन्स, 25.4), 3-263 (सिबली, 89.3), 4-387 (स्टोक्स, 126.1), 5-473 (पोप, 152.2), 6-477 (रुट, 153.6), 7-525 (बटलर, 169.2), 8-525 (आर्चर, 169.3).
गोलंदाजी
इशांत शर्मा 27-7-52-2, जसप्रित बुमराह 31-4-81-2, अश्विन 50-5-132-2, शाहबाज नदीम 44-4-167-2, वॉशिंग्टन सुंदर 26-2-98-0, रोहित शर्मा 2-0-7-0.
रुटचे कसोटीतील उत्तम डाव
धावा / प्रतिस्पर्धी / ठिकाण / वर्ष
254 / पाकिस्तान / ओल्ड ट्रफोर्ड / 2016
228 / श्रीलंका / गॅले / 2021
226 / न्यूझीलंड / हॅमिल्टन / 2019
218 / भारत / चेन्नई / 2021
200ना. /श्रीलंका / लॉर्डस / 2014
100 व्या कसोटीत सर्वोच्च धावा
धावा / फलंदाज / संघ / प्रतिस्पर्धी / ठिकाण / वर्ष
218 / जो रुट/ इंग्लंड / भारत / चेन्नई / 2021
184 / इंझमाम हक / पाकिस्तान/ भारत / बेंगळूर/ 2005
149 / गॉर्डन ग्रिनिज / विंडीज / इंग्लंड / सेंट जॉन्स /1990
भारतात सर्वोच्च खेळी साकारणारे इंग्लिश कर्णधार
इंग्लिश कर्णधार / धावा / ठिकाण / वर्ष
जो रुट / 218 / चेन्नई / 2021
ऍलिस्टर कूक / 190 / कोलकाता / 2012
ऍलिस्टर कूक / 176 / अहमदाबाद / 2012
केविन पीटरसन / 144 / मोहाली / 2008
ऍलिस्टर कूक / 130 / राजकोट / 2016
सलग 3 दीडशतके झळकावणारा दुसरा इंग्लिश फलंदाज
जो रुट हा कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीन दीडशतके झळकावणारा केवळ दुसरा इंग्लिश फलंदाज ठरला. यापूर्वी सर डॉन ब्रॅडमन यांनी असा पराक्रम साधला होता. यापूर्वी लंकेविरुद्ध शेवटच्या दोन कसोटीत अनुक्रमे 228 व 186 धावांची आतषबाजी करणाऱया इंग्लिश कर्णधार जो रुटने येथे आपल्या 100 व्या कसोटीत 218 धावांचे योगदान दिले. सलग 3 कसोटीत दीडशेपेक्षा अधिक धावा जमवणारा तो एकूण सातवा फलंदाज ठरला. टॉम लॅथम, कुमार संगकारा (सलग 4 कसोटी), मुदस्सर नझर, झहीर अब्बास, डॉन ब्रॅडमन, वॅली हॅम्मंड यांनी यापूर्वी असा पराक्रम गाजवला आहे.
आमच्या संघातील निम्यापेक्षा अधिक खेळाडूंना जो रुटप्रमाणे फिरकी गोलंदाजीचा समाचार घेता येत नाही. अर्थात, बहरातील रुट आमचे बलस्थान आहे आणि त्याच्या या 100 व्या सामन्यात त्याला विजयाची भेट देण्यासाठी आम्ही हरसंभव प्रयत्न करणार आहोत.
-इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स
माईक गॅटिंग, इंझमाम हकचे विक्रमही मोडले
खणखणीत द्विशतक झळकावणाऱया जो रुटने या डावादरम्यान माईक गॅटिंग व पाकिस्तानच्या इंझमाम हकचे मागील विक्रमही मोडीत काढले. यापूर्वी एखाद्या इंग्लिश फलंदाजाने भारतीय भूमीत सर्वाधिक धावा जमवण्याचा विक्रम माईक गॅटिंगच्या खात्यावर होता. गॅटिंगने भारतात 207 धावांची खेळी साकारली होती. तो विक्रम रुटने येथे 218 धावांसह आपल्या खात्यावर केला. याशिवाय, पाकिस्तानच्या इंझमाम हकचा 100 व्या कसोटीत सर्वोच्च 184 धावांचा विक्रमही रुटने येथे मोडीत काढला.