अजय देवगण अन् अमिताभ बच्चन यांचा चित्रपट
अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला रनवे 34’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अजय, अमिताभ बच्चन आणि रकुलप्रीत सिंह यांचा हा चित्रपट सत्यकथेवर आधारित असल्याचे समजते. रनवे 34 चित्रपटाची कहाणी जेट एअरवेजच्या दोहा-कोची फ्लाइटच्या एका सत्यघटनेवर आधारित आहे.
2015 मध्ये खराब हवामान आणि अत्यंत कमी दृश्यमानता असतानाही वैमानिकाने जोखीम पत्करून विमान विमानतळावर लँड करविले होते. अशाप्रकारच्या लँडिंगला ब्लाइंड लँडिंग म्हटले जाते, ज्यात काहीही घडू शकते. या धोकादायक लँडिंगमध्ये अनेक प्रवाशांचा जीव पणाला लागला होता. या निर्णयामुळे विमानाच्या कॅप्टनला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते आणि पदावनती करत त्याला कॅप्टनवरून को-पायलट करण्यात आले होते.
या चित्रपटाची निर्मिती अन् दिग्दर्शन अजय देवगणनेच केले आहे. तसेच तोच मुख्य भूमिका साकारत आहे. रनवे चित्रपटात सहवैमानिकाच्या भूमिकेत रकुल प्रीत सिंह दिसून येणार आहे. हा चित्रपट 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच यात बोमन इराणी आणि आकांक्षा सिंह तसेच प्रसिद्ध युटय़ूबवर कॅरिमिनाटी देखील दिसून येणार आहे.