मुंबई / वृत्तसंस्था
कॅगिसो रबाडा व ऍनरिच नोर्त्झे ही दक्षिण आफ्रिकन जलद गोलंदाजांची जोडी मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल झाली. मात्र, हे दोन्ही गोलंदाज आता आठवडाभर क्वारन्टाईन असतील. त्यामुळे, संघाच्या पहिल्या लढतीत ते खेळू शकणार नाहीत. दिल्लीची पहिली लढत दि. 10 रोजी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध मुंबईत होणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सने रबाडा व नोर्त्झे यांचे स्वागत करत त्यांच्यामुळे संघाची जलद गोलंदाजी आघाडी भक्कम असेल, असे नमूद केले. रबाडा, नोर्त्झे तसेच क्विन्टॉन डी कॉक, लुंगी एन्गिडी, डेव्हिड मिलर हे पाकिस्तानविरुद्ध 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघात समाविष्ट होते. मालिका पूर्ण झाल्यानंतर ते भारतात दाखल झाले आहेत.
दिल्ली कॅपिटल्स संघाने या दोन्ही गोलंदाजांना यंदाही आपल्या संघात कायम राखले असून मागील हंगामात संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली, त्यावेळी या उभयतांचा त्यातील वाटा मोलाचा ठरला होता.