वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांना आपले पद सोडावे लागले. दरम्यान पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या विचारात असल्याचे समजते.
पाकच्या क्रिकेट इतिहासामध्ये इम्रान खान आणि रमीझ राजा हे माजी कर्णधार होते. पाकच्या पंतप्रधानपदी इम्रान खान यांची नियुक्ती झाल्यानंतर पीसीबीच्या अध्यक्षपदी रमीझ राजाची नियुक्ती करण्यात आली होती. सध्या रमीझ राजा दुबईमध्ये आयसीसीच्या बैठकीसाठी दाखल झाले असून ते मायदेशी परतल्यानंतर पीसीबीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा चालू आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये रमीझ राजा यांची पीसीबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. इम्रान खान यांची पंतप्रधानपदावरून उचलबांगडी झाल्याने आता पाकच्या क्रिकेट मंडळामध्येही मोठे फेरबदल अपेक्षित आहेत.