येळ्ळूर-झाडशहापूर शिवारातील रस्त्यासाठी 3 लाखांचा निधी : रस्ता कामाला चालना
प्रतिनिधी / येळ्ळूर
येळ्ळूरमधून झाडशहापूरकडे शिवारातून जाणाऱया रस्त्याच्या कामासाठी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी तीन लाखांचा निधी जिल्हा पंचायतमधून मंजूर करून घेतला. या कामाला सुरुवात झाली असून जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विलास बेडरे, राजू डोण्याण्णावर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी येळ्ळूर, अवचारहट्टी, देसूर यासह परिसरात विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. पाणी प्रश्नाबरोबरच रस्ता, गटारी यासाठी जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून निधी मंजूर करून घेतला आहे. येळ्ळूर ते झाडशहापूर हा रस्ता अत्यंत खराब झाला होता. काही ठिकाणी पावसामुळे रस्ता वाहून गेला आहे. त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 3 लाखांचा निधी उपलब्ध केला आहे. या रस्त्याचे पूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आता खडीकरणाला प्रारंभ झाला आहे. येळ्ळूर-झाडशहापूर रस्ता झाल्यामुळे शेतकऱयांना त्याचा लाभ होणार आहे. यावेळी सुनील कुंडेकर, कृष्णा गोरल, पप्पु कुंडेकर, राहुल हुडकेकर, परशराम नंदिहळ्ळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.