प्रतिनिधी /मडगाव
गोव्याचे माजी मंत्री आणि भाजप नेते रमेश तावडकर यांची दादरा-नगर हवेली आणि दमण आणि दीव यांच्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गुजरातचे उपप्रभारी म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.
अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार समीर उरांव यांनी ही नियुक्त केली असून तसा आदेश जारी करण्यात आलेला आहे. रमेश तवडकर यांच्या नियुक्तीबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
रमेश तवडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानले आहे. एसटी बांधवांच्या कल्याणासाठी आणि मानवी विकासासाठी आपण सर्व ते प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रीया रमेश तवडकर यांनी व्यक्त केली आहे.
काणकोण मतदारसंघात सद्या भाजपच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजप उमेदवारीच्या शर्यतीत रमेश तवडकर हे देखील आहेत. आत्ता त्याची दादरा-नगर हवेली आणि दमण आणि दीव यांच्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने त्याचे वजन वाढले आहे.