प्रतिनिधी/ फोंडा
माजी मंत्री तथा एसटी कमिशनर म्हणून कार्यरत असलेले रमेश तवडकर हे पुनो वेळीप यांना माराहणप्रकरणी दोषी असल्याचा निवाडा काणकोण प्रथम वर्ग न्यायालयाने दिला आहे. याप्रकरणी शिक्षा 28 ऑक्टो रोजी सुनावण्यात येणार आहे. न्याय व नैतिकतेने जबाबदारी स्वीकारून रमेश तवडकर यांनी एसटी कमिशनर म्हणून पायउतार व्हावे अशी जोरदार मागणी मगो पक्षाच नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.
रमेश तवडकर हे भारतीय दंड संहितेच्या कलम 352 व 506 (2) कलमाखाली दोषी आढळले आहे. कमिशनर हे पद न्यायालयाच्या चौकटीत बसत असून या पदावर बसणारा व्यक्ती हा स्वच्छ चारीत्र्याचा व निपक्षपाती कारभार हाकणारा असावा असा दावा सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेली व्यक्ती या पदावर राहण्यास लायक नसून एसटी कमिशनर या पदाची पवित्रता कायम राखून ठेवताना सरकारने तवडकरांची उचलबांगडी करून त्वरीत कारवाई करावी अशी मागणी ढवळीकर यांनी केली आहे.