प्रतिनिधी/ मडगाव
वाटेत अडवून धमकी दिल्याच्या एका प्रकरणात गोव्याचे माजी क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांना न्यायालयाने दोषी ठरविले असून 28 ऑक्टोबर रोजी तवडकर यांना शिक्षा जाहीर करण्यात येणार आहे. आपण या निवाडय़ाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात जाणार असून तेथे आपण निश्चितपणे निर्दोष होऊन येऊ, असे स्पष्टीकरण तवडकर यांनी केले आहे.
माजी मंत्री तवडकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाखाली तीन आरोप होते. 341 (अडविणे), 352 (मारहाण करणे) व (506 (2) (जीवे मारण्याची धमकी देणे) हे आरोप. काणकोण पोलिसांनी काणकोण न्यायालयात या प्रकरणी आरोपपत्र सादर केले होते. साक्ष व पुरावे यावर आधारुन ‘मारहाण करणे तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्यासंबंधीचा आरोप न्यायालयात सिद्ध झाल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र अडविले हा भारतीय दंड संहितेच्या 341 कलमाखालील आरोप न्यायालयात सिद्ध होऊ न शकल्याने न्यायालयाने या आरापातून तवडकर यांना संशयाचा फायदा देऊन या निर्दोष मुक्त केले.
मारहाण करणे
मारहाण करण्याचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास आरोपीला जास्तीत जास्त 3 महिन्यांची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही अशी तरतूद आहे. तवडकर यांच्यावर हा आरोप सिद्ध झाला आहे.
जीवे मारण्याची धमकी देणे
जीवे मारण्याची धमकी दिल्यास भरतीय दंड संहितेच्या 506 (2) कलमाखाली गुन्हा नोंद होतो आणि हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास जास्तीत जास्त 2 वर्षाची शिक्षा आणि दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. हा आरोपही सिद्ध झालेला आहे. ..
खटल्याची पार्श्वभूमी…
न्यायालयात सादर करण्यात आलेल्या कागदपत्रानुसार काणकोण परिसरातील पुनो वेळीप हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. पुनो वेळीप हे आपल्या एका मित्राबरोबर दुचाकीने चावडी – काणकोण येथे जात होते. तीन तळे गुळय़ाजवळ ते पोहोचले तेव्हा पाठीमागे एक पांढऱया रंगाची कार येत असल्याचे दिसून आले. कारमध्ये संशयित रमेश तवडकर बसलेले होते. वेळीप यांना दुचाकी थांबविण्याची सूचना तवडकर यांनी दिली. मात्र या सूचनेकडे त्यांनी लक्ष दिले नाही. काही वेळाने पाठीमागून येणाऱया कारने दुचाकीला ओव्हरटेक केली आणि दुचाकीसमोर कार उभी करण्यात आली. रमेश तवडकर यांनी आपल्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिली असे पुनो वेळीप यांनी काणकोण पोलीस स्थानकात केलेल्या तक्रारीत म्हटले होते.
पोलीस उपनिरीक्षक दामोदर शिरोडकर यांनी या प्रकरणाचा तपास करुन तवडकर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 341, 352 व 506 (2) कलमाखाली गुन्हा नोंद केला आणि न्यायालयात आरोपपत्र सादर केले. साहाय्यक सरकारी वकील अनिरुद्ध प्रभू चिमुलकर यांनी सरकारपक्षाच्यावतीने न्यायालयात काम पाहिले.
साक्ष व पुरावे पाहून न्यायालयाने संशयित आरोपी रमेश तवडकर यांना संशयाचा फायदा देत 341 कलमाखालील आरोपातून निर्दोष मुक्त केले तर उर्वरित दोन आरोपाखाली दोषी ठरविले आहे. आरोपी तवडकर यांना किती शिक्षा देण्यात यावी यावर न्यायालयात 19 ऑक्टोबर 2020 रोजी युक्तिवाद झाला. यावेळी सरकारपक्ष व आरोपीच्या वकिलानी युक्तिवाद केला. आरोपीला 28 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी शिक्षा ठोठावली जाईल असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
अपीलमध्ये निर्देष सिद्ध होणार-तवडकर
खोटे पुरावे व खोटी साक्ष आपल्याविरुद्ध न्यायालयात सादर करण्यात आली. यावर आधारुन न्यायालयाने आपल्याला दोषी ठरविले. मात्र कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ाला आपण जिल्हा न्यायालयात अपील करणार आहे, तेथे आपण आपले निर्दोषत्व सिद्ध करणार असल्याचे माजी मंत्री तसेच मारहाण करण्याचा प्रयत्न करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या आरोपाखाली दोषी ठरविलेले माजी मंत्री रमेश तवडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आपल्याविरुद्ध ज्यांनी कारस्थान रचलेले आहे ते ‘तेथेच’ आहेत. मात्र, आपण आज भारतीय जनता पक्षात आलेलो असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.