बिंदू चौक सबजेलजवळील देव वाडा, हनुमानाच्या पारावरील बालपण, राजाराम टॉकीजमध्ये विवाह अन् पती-पत्नीने घेतलेली एकमेकांची मुलाखत
प्रतिनिधी/कोल्हापूर
आपल्या दमदार अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टी (बॉलीवूड) गाजविणारे दीर्घायुष्य लाभलेले ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सात दशके अभिनयाच्या क्षीतिजावर चमकणारा तारा काळाच्या पडद्याआड गेला. कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या रमेश देव यांच्या आठवणींनी करवीरकर गहिवरले. अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
देव वाड्य़ात बालपण, विद्यापीठ हायस्कूल, राजाराम कॉलेजमध्ये शिक्षण
देव घराण्याचा बिंदू चौक सब जेलजवळ पूर्वीच्या काळी भलामोठा वाडा होता. देववाडा म्हणून त्याची ओळख होती. या वाडय़ातच रमेश देव यांचा जन्म झाला. त्यांना कॅफ्टन उमेश देव आणि प्रताप देव असे भाऊ देखील होते. रमेश देव यांचे शालेय शिक्षण भक्ती सेवा विद्यापीठ हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण राजाराम महाविद्यालयात झाले. सध्या महानगर भाजपचे कार्यालय आहे. त्या ठिकाणी पूर्वी देववाडा होता. तेथे भारतीय मजदूर संघाचे कार्यालयही होते. पुढे बंकापुरे नामक बिल्डरने वाडय़ाच्या जागी अपार्टमेंट उभारली.
करवीर नगर वाचन मंदिर परिसरातील घराण्यांशी निकटचा संबंध
सबजेल परिसरातील करवीर नगर वाचन मंदिरजवळील दिवटे, झाड, अतिग्रे, वरूटे-नाईक, पवार आदी स्थानिक घराण्यांशी देव यांचा घनिष्ठ संबंध होता. मेन राजाराम हायस्कूलजवळ असणाऱया हनुमान मंदिराच्या पारावर रमेश देव बालपणी खेळत असत.
चित्रतपस्वी भालजी पेंढाकर, राजा परांजपे मार्गदर्शक
बालकलाकार म्हणून चित्रपटात एंट्री झाल्यानंतर देव यांचा चित्रतपस्वी भालजी पेंढारकर आणि अभिनेते राजा परांजपे यांच्याशी संपर्क आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देव यांनी वाटचाल सुरू केली. पुढे त्यांचा मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रवासही सुरू झाला.
राजाराम टॉकीजमध्ये रमेश-सीमा देव यांचा विवाह
रमेश देव आणि सिमा देव (पूर्वाश्रमीच्या नलीनी सराफ) यांचा विवाह कोल्हापूरमधील निंबाळकर यांच्या राजाराम टॉकीजमध्ये (नंतरही ही टॉकीज अयोध्या म्हणूनही ओळखली जायची) 1963 साली झाला होता. या लग्नानंतर सत्यनारायणाचा पूजा करण्यासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी देववाड्य़ात गेले होते. नाटक आणि चित्रपटांमुळे रमेश देव, सिमा देव यांचा जोशी यांच्या घराण्याशी संबंध होता.
दिग्दर्शक राजदत्त साडू तर आयुक्त पृथ्वीराज बायस आतेभाऊ
दिग्दर्शक राजदत्त हे रमेश देव यांचे साडू. सीमा देव आणि राजदत्त यांच्या पत्नी सख्या बहीणी. विशेष म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्तपद भूषविले कर्तव्यदक्ष अधिकारी पृथ्वीराज बायस हे रमेश देव यांचे आते भाऊ. अभिनयाच्या निमित्ताने मुंबईकर झालेल्या रमेश देव यांचा कोल्हापूरशी ऋणानुबंध राहिला.
रमेश-सीमा देव यांनी घेतली होती एकमेकांची मुलाखत
लक्ष्मीकांत देशमुख जिल्हाधिकारी असताना कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये रमेश देव आणि सीमा देव यांचा त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला होता. त्यावेळी देव दाम्पत्याने एकमेकांची मुलाखत घेत जीवनातील अनेक गोड, कटू आठवणी ताज्या केल्या होत्या.
कोल्हापुरी तांबडा-पांढरा आणि मटणावर ताव
चित्रपटसृष्टीतील बिझी शेडय़ूलमुळे रमेश व सीमा देव यांचे कोल्हापूरला येणे-जाणे कमी होते. मात्र ते कोल्हापूरला आल्यावर निकटचा संबंध असलेल्या परिवारांना भेट असत. कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अणि कोल्हापुरी मटणावर रमेश देव ताव मारत असत. रमेश देव यांचे बंधू कŸढफ्टन उमेश देव यांचा सबजेल परिसरातील नागरिकांशी शेवटपर्यंत संबंध होता. जुना राजवाडय़ाजवळील झाडांच्या सायकलच्या दुकानात ते रमेश देव यांच्या चित्रपटातील गोष्टी, प्रसंग सांगत असत.
पेंढाकरकर शताब्दी कार्यक्रमात कोल्हापूरकर म्हणून सहभाग
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मुंबई भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात कोल्हापूरमधून अनेक कलाकार मंडळींसह नागरिकही सहभागी झाले होते. या कार्यक्रमात रमेश देव यांनी कोल्हापूरकर म्हणून सहभागी होत असल्याचे सांगत कोल्हापूरच्या मातीशी नाळ कायम असल्याचे अधोरेखित केले होते.
रमेश देव यांनी लढविली होती कोल्हापूर लोकसभा
रमेश देव आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे घनिष्ठ संबंध होते. 1996 ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी तत्कालिन शिवसेनेचे नेते रामभाऊ चव्हाण यांना कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याचे निश्चित झाले होते. ऐनवेळी शिवसेना प्रमुख ठाकरे यांनी रमेश देव यांना उमेदवारी देण्याचे जाहीर करत सर्वांना धक्का दिला. निवडणुकीत रमेश देव विरूद्ध तत्कालिन काँग्रेसचे खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्यात लढत झाली. अपेक्षेप्रमाणे उदयसिंगराव गायकवाड 2 लाख 35 हजार739 मते घेऊन विजयी झाले. रमेश देव यांना 1 लाख 68 हजार 414 मते मिळाली. अत्यंत कमी वेळेत त्याकाळी रमेश देव यांनी मुंबईहून कोल्हापूरमध्ये येऊन मतदार संघ पिंजून काढत प्रचार केला होता. शिवसेनेचे तत्कालिन आमदार सुरेश साळोखे यांनी त्यावेळी प्रचाराची धुरा सांभाळली होती.
बादशाही लाॉजमध्ये जुळल्या रेशिम गाठी …
प्रभात आणि शाहू टॉकीजजवळील शशिकांत जोशी यांचा न्यू बादशाही लॉज चित्रपट, नाटकातील अभिनेते, अभिनेत्री व इतरांसाठी हक्काचे घर होते. या ठिकाणी धुमाळ, प्रभाकर पणशीकर, विक्रम गोखले, मधु आपटे, वसंत शिंदे जयश्री गडकर, रंजना, आशा पाटील, जयमाला शिलेदार यांच्यासारखे महान, दिग्गज अभिनेते, अभिनेत्री राहत असत. या न्यू बादशाही लॉजमध्ये चित्रीकरणासाठी कोल्हापूरमध्ये येणाऱया रमेश देव आणि सीमा देव यांच्या रेशिम गाठी जुळल्या गेल्या. शशिकांत जोशी यांच्या मातोश्री नलीनीबाई जोशी या रमेश देव यांनी लिहिलेली प्रेमपत्रे सीमा देव (पूर्वाश्रमीच्या नलीनी सराफ) यांच्याकडे सोपविण्याचे काम करत या दोघांना जवळ आणले. पुढे 1963 मध्ये नलीनी सराफ या सीमा रमेश देव झाल्या. ही आठवण प्रतिज्ञा नाटय़रंग संस्थेचे प्रमुख प्रशांत जोशी यांनी सांगितली.
श्रीकला थिएटरमध्ये महिना पाच रूपये मानधनावर काम
प्रतिज्ञा नाटय़रंगचे प्रशांत जोशी यांचे आजोबा नानासाहेब जोशी यांची त्याकाळी श्रीकला थिएटर नामक कंपनी होती. या कंपनीत ऐन उमेदीच्या काळात रमेश देव महिना पाच रूपये मानधनावर काम करत असत. हे रमेश देव नंतर बडे कलाकार बनले.
प्रतिज्ञाच्या विक्रमी नाट्य़प्रयोगाला देवाचा आर्शीवाद
वीस वर्षांपूर्वी प्रतिज्ञा नाटय़रंग संस्थेने शांतेचं कार्ट चालू आहे, या नाटकाचे 33 तासात 11 प्रयोग करण्याचा विक्रम करण्याचे निश्चित केले होते. यावेळी रमेश देव यांनी स्वत उपस्थिती लावून मनपूर्वक नाटकाचा दहा प्रयोग पाहिला. त्यानंतर कलाकार व इतरांचे कौतुक करत त्यांनी त्यांना आर्शीवादही दिले. देवाचा आर्शीवाद त्यावेळी प्रतिज्ञाच्या कलाकारांना मिळाला होता. त्यात प्रशांत जोशीही होते.