प्रतिनिधी / बेळगाव
रयत गल्ली, वडगाव परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणाऱया विहिरीमधील विद्युत पंप खराब झाल्याने पंधरा दिवसापासून पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणी समस्येबाबत माजी नगरसेवक दिनेश रावळ यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदर बाब पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून देवून समस्येचे निवारण करण्यात आले आहे. यावेळी नव्या विद्युत पंपाचे पूजन करण्यात आले.
रयत गल्लीतील विहिरीद्वारे परिसरात पाणीपुरवठा केला जातो. परिसरात शेतकरी कुटुंबे असल्याने जनावरांची संख्या मोठी आहे. मात्र सदर विहिरीमधील विद्युतपंप खराब झाल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे सदर समस्येबाबतची तक्रार रहिवाशांनी माजी नगरसेवक दिनेश रावळ यांच्याकडे केली होती. रावळ यांनी पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली. विद्युतपंप खराब झाल्याने नव्याने विद्युतपंप बसविण्याची गरज होती. त्यामुळे अधिकाऱयांनी नवीन विद्युत पंप मंजूर केला. नव्या पंपाचे पूजन माजी नगरसेवक दिनेश रावळ व पंच कमिटी यांच्याहस्ते करण्यात आले. सदर विहिरीमध्ये नवीन विद्युप पंप बसवून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आल्याने पाणी समस्येचे निवारण झाले आहे. नव्या विद्युत पंपाचे पूजन करताना मनोहर काजोळकर, परशराम धामणेकर, भय्या होसुरकर, उत्तम होसुरकर आदीसह रयत गल्ली परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.