वार्ताहर / कुर्ली :
येथील सिद्धेश्वर विद्यालयातील विज्ञान शिक्षक एस. एस. चौगुले यांची रयत शिक्षण संस्था सातारा येथे लाईफ वर्कर म्हणून निवड केल्याचे डॉ. भाऊसाहेब कराळे यांनी पत्राद्वारे कळविले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या विविध निकषांच्या आधारे ही निवड केली जाते. चौगुले हे गेली वीस वर्षे या संस्थेच्या कुर्ली शाखेत कार्यरत असून एक उपक्रमशील विज्ञान शिक्षक म्हणून ते परिचित आहेत.
बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करीत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी ही आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था आहे. संस्थेच्या ध्येयधोरणानुसार येथून पुढेही कार्य करण्याचा मानस आहे, असे चौगुले यांनी सांगितले.
चौगुले यांना संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, सहसचिव विलास महाडिक, प्राचार्य आर. के. शिंदे, विभागीय अधिकारी के. बी. मालुसरे, मुख्याध्यापक बी. एस. पाटील, स्कूल कमिटी व बेटरमेंट कमिटी आदींचे प्रोत्साहन लाभत आहे.