कनिष्ठ विश्व कुस्ती चॅम्पियनशिप : पृथ्वी पाटील, यश, अनिरुद्ध यांना कांस्यपदके
वृत्तसंस्था /उफा, रशिया
कनिष्ठांच्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या रविंदरला दुसरे जेतेपद मिळविण्याचे स्वप्न भंगल्याने अखेर रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र महिलांमध्ये भारताच्या बिपाशाने 76 किलो वजन गटात अनपेक्षितपणे अंतिम फेरी गाठत सर्वांना चकित केले. पुरुष विभागात यश (74 किलो गट), पृथ्वी बाबासाहेब पाटील (92 किलो), अनिरुद्ध (125 किलो) यांनी कांस्यपदक मिळविले.
भारताने फ्री स्टाईल विभागात एकूण सहा पदके पटकावली. गौरव बलियान (79 किलो) व दीपक (97 किलो) यांनी मंगळवारीच कांस्यपदक पटकावले हेते. रविंदरने यापूर्वी कॅडेट गटाचे जेतेपद मिळविले असल्याने त्याला दुसरे विश्व टायटल जिंकण्याची संधी होती. पण इराणच्या रहमान मुसा अमूझदखलिली या बलाढय़ मल्लाविरुद्ध त्याला फारशी चमक दाखविण्याची संधी मिळाली नाही. रेहमानने गेल्या जूनमध्ये यासर दोगू वरिष्ठांची कुस्ती स्पर्धा जिंकली होती. 61 किलो वजन गटाच्या या लढतीत रविंदरला बचाव करण्यातच जास्त वेळ खर्ची घालावा लागला. रेहमानने त्याला डोके आणि शरीराच्या पकडीतच गुंतवून ठेवत अखेर ही लढत 9-3 अशा फरकाने जिंकत सुवर्णपदक पटकावले.
74 किलो गटाच्या प्लेऑफ लढतीत यशने अर्मेनियाच्या अर्मेन मुसिकयानवर 9-2 अशा गुणाने मात केली तर दुसऱया लढतीत किर्गीजस्तानच्या स्टॅम्बुल झानीबेकविरुद्ध 2-5 असे पिछाडीवर पडल्यानंतरही त्याने 12-6 असा विजय खेचून आणला. शेवटच्या 90 सेकंदात त्याने डावपेचात बदल करून जलद हालचालीवर गुण मिळविले. प्रारंभीच मोठी आघाडी घेतल्यामुळे स्टॅम्बुल काहीसा गाफील राहिला, त्याचा लाभ यशने उठवित आगेकूच केली.
कोल्हापूरच्या पृथ्वी पाटीलने 92 किलो वजन गटाच्या लढतीत रशियाच्या इव्हान किरिलोव्हवर 2-1 अशी मात करून कांस्यपदक पटकावले. पाटील व इव्हान दोघेही बराच वेळ चाल न करता राहिल्याने त्यांना निष्क्रियतेचा एकेक गुणाचा दंड करण्यात आला. पण इव्हानने फाऊल प्ले केल्याने त्याला आणखी एका गुणाचा दंड झाला आणि त्या बळावर पाटीलचा विजय निश्चित झाला. 125 किलो गटाच्या लढतीत अनिरुद्धने अझरबैजानच्या आयदिन अहमदोव्हचा 7-2 असा पराभव करून कांस्य मिळविले.
बिपाशा अंतिम फेरीत
महिला विभागात बिपाशाने प्रारंभी संथ सुरुवात केली. पण प्रत्येक लढतीत तिचा खेळ सुधारत गेला. तिने कझाकच्या दिलनाझ मुल्किनोव्हाचा 6-3 असा पराभव केल्यानंतर मंगोलियाच्या ओदबाग उल्झीबातवर 9-4 अशी मात करीत अंतिम फेरी गाठली. 50 किलो वजन गटात भारताच्या सिमरनने दोन विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली होती. पण या फेरीत तिला अमेरिकेच्या एमिली किंग शिल्सनकडून पराभव स्वीकारावा लागला. तिला आता कांस्यपदक मिळविण्याची संधी आहे. सिमरनने प्रथम रोमानियाच्या जॉर्जियाना लॅव्हिनिया अँटुसाविरुद्ध एकही गुण न देता तांत्रिक सरसतेच्या आधारे विजय मिळविला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत अझरबैजानच्या गुल्ताकिन शिरिनोव्हाला चीतपट करून शानदार विजय खेचून आणला. या लढतीच्या पहिल्या दोन फेऱयांत दोघींनी चपळ आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन घडविले. पण अखेरीस सिमरनने तिच्यावर ताबा मिळविला आणि तिला चीतपट करीत विजय मिळविला. यावेळी ती 18-8 अशा गुणांनी आघाडीवर होती. सितो (55 किलो गट), कुसुम (59 किलो), अर्जू (68 किलो गट) यांना मात्र उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी अंतिम फेरी गाठली असल्याने रेपेचेजच्या माध्यमातून कांस्य जिंकण्याची त्यांना संधी आहे.