वृत्तसंस्था/ साऊदम्पटन
भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू रविंद्र जडेजाने आपल्या सरावाला रविवारी येथे पहिल्यांदाच प्रारंभ केला. 18 जून रोजी होणाऱया आयसीसीच्या पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
भारतीय पुरूष आणि महिला क्रिकेट संघांचे गेल्या गुरूवारी लंडनमध्ये आगमन झाले. भारताचा महिला क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱयात एकमेव कसोटी तसेच त्यानंतर वनडे आणि टी-20 मालिका खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम लढत खेळल्यानंतर यजमान इंग्लंडबरोबर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघातील अष्टपैलू रविंद्र जडेजाने हॅम्पशायर बाऊल मैदानावर रविवारी पहिल्यांदाच क्रिकेटचा काही वेळ सराव केला. इंग्लंडच्या दौऱयावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघातील सर्व क्रिकेटपटूंची आयसोलेशनपूर्वी पुन्हा कोरोना चाचणी घेण्यात आली. क्रिकेटपटूंच्या आयसोलेशनच्या कालावधीत ठराविक अंतराने कोरोना चाचण्या घेतल्या जाणार आहेत. न्यूझीलंडचा संघ यापूर्वीच इंग्लंडमध्ये दाखल झाला असून यजमान इंग्लंडबरोबर त्यांची दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. साऊदम्पटनमध्ये दाखल होण्यापूर्वी न्यूझीलंडच्या सर्व क्रिकेटपटूंची नियमितपणे कोरोना चाचणी घेतली जाणार आहे.