व्यापाऱयांच्यावतीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील विविध परिसरात घोषित करण्यात आलेले कंटेन्मेट झोन रद्द करून नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. तसेच लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असून विविध व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र बाजारपेठेतील काही गल्ल्यांमधील बॅरिकेडस् हटविण्यात आलेले नसल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. रविवारपेठसह बाजारपेठेतील बॅरिकेडस् हटविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन व्यापाऱयांच्यावतीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना देण्यात आले.
शहरातील विविध रस्त्यांवर घालण्यात आलेले बॅरिकेडस् हटविण्यात आली आहेत. मात्र निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या परिसरातील काही ठिकाणचे बॅरिकेडस् हटवून व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र रविवार पेठ, कांदा मार्केट, मेणशी गल्ली, भातकांडे गल्ली, आदी परिसरातील बॅरिकेडस् हटविण्यात आले नाहीत. त्यामुळे बॅरिकेडस् हटवून व्यवसाय करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना बाजारपेठेतील व्यावसायिक उपस्थित होते..