प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात वाढत चाललेली कोरोना बाधितांची संख्या पहाता सातारकरांनी स्वयंस्फुर्तीने लॉकडाऊन पाळले. शहरात सकाळपासून सर्व रस्ते ओस पडले होते. पोलिसांच्या गाडय़ा कधी येत होत्या अन् कधी जात होत्या हेही नागरिकांना समजत नव्हते. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्वतः शहरात फिरुन नेमक्या परिस्थितीचा आढावा घेतला. मेडिकल दुकाने वगळता कोणतेही दुकान सुरु नव्हते. शहरात अगदीच पिन ड्रॉप सायलेंट अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
विकेंड लॉकडाऊनच्या दुसऱया दिवशी साताऱयात सकाळपासूनच शांतता दिसत होती. बसस्थानक परिसरात पोलीस कर्मचारी देशमुख हे जे चुकारीने पहायला आले त्यांना बाहेर काढत होते. बाहेरच्या शिंदेच्या पेपट स्टॉलवरही कोणी नव्हते. तीन ते चार युवक बसस्थानकाच्या बाहेर जाण्यासाठी काय मिळते काय ते पहात होते. साधी रिक्षाही त्यांना मिळाली नाही. भाजी मंडईतही एकदम शुकशुकाट जाणवत होता. एखादा विक्रेत्याच आपल्या साहित्य व्यवस्थित आहे की नाही याची पाहणी करत होता. नाक्यावर सात ते आठ पोलीस उभे होते. चुकारीचे येणारे वाहन हे कसेही येत होते कसेही जात होते. गाढवं, कुत्री, मोकाट गायीच नाक्यावर फिरताना दिसत होती. पोवई नाका ते पोलीस मुख्यालय या रस्त्यावर सगळीकडे सन्नाटा होता. शाहु चौकात केवळ शाहू चौकात सुरु असलेल्या बांधकामच्या ठिकाणी चार ते पाच कामगार काम करताना दिसत होते. सतत गजबजलेला असलेल्या राजवाडा परिसरात एकदोन फळविक्रेतेच दिसत होते. राजपथावरही एखादा दुसरा चुकारीचा नागरिक बाहेर फिरताना दिसत होता. त्यांनाही बंदोबस्ताला असलेले पोलीस हटकत होते. समर्थ मंदिर, बोगदा परिसरातही एकदम भयान शांतता दिसत होती.
उद्याच्या लॉकडाऊनबाबत उत्सुकता
उद्या नेमके काय होणार आहे. कोणते नियम असणार आहेत याचीच चौकशी साताऱयातून बाहेर गेलेले सातारकर फोन करुन सातारकरांना विचारत होते. साताऱयात नेमकी कशी परिस्थिती आहे हे जाणून घेत होते. आले तर पोलीस अडवतात का अडवले तर गुन्हा दाखल करतात काय याची चौकशी करत होते.
पालिकेचे कर्मचारी कार्यरत
सातारा पालिकेचे कर्मचारी या लॉकडाऊनच्या कार्यकाळात कार्यतत्पर दिसत होते. जेथे जेथे कंटेटमेंट झाला आहे. तो कंटेमेंट झोन करण्यासाठी त्यांची गडबड दिसत होती. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती घेत होते.