- एकूण कोरोनाबाधितांची संख्या 818
- 683 रुग्णांवर उपचार सुरू
- 153 रुग्ण कोरोनामुक्त
- 338 मांगोरहिलमधील रुग्ण
- 205 मांगोरहिलशी संबंधित
- 40 सडा
- 37 बायणा
- 25 चिंबल
- 19 मोर्ले
- 17 न्यू वाडे
प्रतिनिधी / पणजी
काल रविवारी कोरोनाचे तब्बल 64 नवीन रुग्ण मिळाले असून सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या आता 683 वर पोहोचली आहे. रविवारी 6 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची 818 झाली आहे, असून त्यातील 135 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
आरोग्य खात्याने वरील आकडेवारी प्रकाशित केली असून गोव्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जनतेमध्ये घबराट वाढत असून हा आकडा आता वाढून वाढून कुठे पोहोचणार? असा प्रश्न जनतेला पडल्याचे दिसून येत आहे. गोव्यासारख्या लहान राज्यात 683 सक्रीय रुग्ण म्हणजे चिंता करण्यासारखी परिस्थिती आहे.
रविवारी सुमारे 100 आंतरराष्ट्रीय प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले, तर 235 देशी प्रवाशांनाही त्याच वर्गाकरिता ठेवण्यात आले आहे. 20 जणांना संशयित कोरोना रुग्ण म्हणून गोमेकॉच्या आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे. 147 प्रवाशांना फॅसिलिटी क्वारंटाईनमध्ये सामाविष्ट करण्यात आले आहे.
रविवारी तपासणीसाठी 2082 जणांचे नमुने गोळा
रविवारी एकूण 2082 जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यातील 1577 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 64 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह मिळाले. 641 रुग्णांचे अहवाल येणे बाकी असून ते प्रतीक्षेत आहेत. त्याशिवाय विविध रेसिडेन्सी, हॉटेलमध्ये 1167 जणांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे.
सक्रीय 683 कोरोना रुग्णांपैकी सर्वांधिक 338 रुग्ण हे मांगोरहिलमधील आहेत, तर तेथून सलग्न होऊन बाधित झालेले रुग्ण 205 आहेत. मडगावमध्ये 10 तर कुडतरीमध्ये 21 रुग्णांची नोंद झाली आहे. आंबेली येथे 13 कोरोनाबाधित सापडले आहेत. केपे येथे 5 तर राय येथे 7 कोरोना रुग्ण मिळाले आहेत. बेती, पर्वरी, नावेली, वाडे येथे प्रत्येकी एक रुग्ण असून चिंबल येथे चार रुग्ण आढळले आहेत.
आतापर्यंत एकूण रुग्णांमध्ये सडा 40, बायणा 37, चिंबल 25, मोर्ले 19 न्युवाडे 17 ही कोरोनाग्रस्त ठिकाणे आहेत. रविवारी 64 एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून बरे होणाऱया रुग्णांची संख्या कमी तर वाढणाऱया रुग्णांची संख्या जास्त आहे, असे चित्र दिसून येत आहे.
कोविड हॉस्पिटलातील एका : रुग्णाची प्रकृती खालावली
प्रतिनिधी / मडगाव
मडगावच्या कोविड हॉस्पिटलात दाखल करण्यात आलेल्या एका रूग्णाची प्रकृती खालावली असून सद्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या रूग्णाची फुफ्फुसे कमकवुत झाल्याने डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. ही व्यक्ती 85 वर्षाची आहे. यापुर्वी देखील एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. नंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती.
सद्या कोविड हॉस्पिटलाच्या अतिदक्षता विभागात तीन रूग्ण असून दोघांच्या प्रकृतीत विशेष अशी सुधारणा झालेली नाही. एकाची प्रकृती खालावली आहे. सद्या या ठिकाणी 114 जण उपचार घेत असून अतिदक्षता विभागात दाखल केलेले रूग्ण सोडल्यास सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, काल रविवारी या हॉस्पिटलातून तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाच वर्षाखालील व 65 वर्षांवरील रूग्णांना कोरोना संसर्गाचा अधिक त्रास होत असल्याची माहिती देण्यात आली. कोविड हॉस्पिटलात वयस्क रूग्णच अधिक प्रमाणे दाखल होऊ लागले आहेत. या ठिकाणी सिम्प्टोमॅटिक रूग्णांवरच उपचार केले जात आहेत.