उघडिपीमुळे सर्वांनाच काहीप्रमाणात दिलासा : बऱयाच दिवसानंतर सूर्यनारायणाचे दर्शन : खरेदीसाठी नागरिक बाहेर
प्रतिनिधी /बेळगाव
आठवडाभर चाललेल्या धुवांधार पावसाने रविवारी मात्र उसंत घेतली. यामुळे खरेदीसाठी नागरिक बाहेर पडल्याचे चित्र पहायला मिळाले. मागील काही दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाने नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सखल भागात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. रविवारी मात्र पावसाचा जोर कमी झाल्याने काहीप्रमाणात दिलासा मिळाला.
शुक्रवारी काही प्रमाणात पाऊस कमी झाला असला तरी शनिवारी जोरदार पाऊस बेळगाव परिसरात झाला. दुपारनंतर पावसाने जोर धरल्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. ओमनगर-खासबाग, आनंदनगरöवडगाव या सखल भागांमध्ये पाणी शिरले होते. रात्री उशिरापर्यंत पावसाचे पाणी या परिसरात साचले होते.
रविवारी मात्र सकाळपासूनच पावसाचा जोर कमी असल्याचे दिसून आले. पावसाने उघडीप दिल्यामुळे सर्वांनाच काहीप्रमाणात दिलासा मिळाला. बऱयाच दिवसानंतर सूर्यनारायणाचे दर्शन बेळगावमधील नागरिकांना घेता आले. रविवारी साप्ताहिक सुटी असल्यामुळे नोकरदार बाजारात खरेदीसाठी दाखल झाले. मध्यंतरी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या. पाऊस कमी झाल्यामुळे सखल भागात साचलेले पाणी कमी होण्यास मदत झाली.
इंद्रधनुष्याचे दर्शन
पावसाने उसंत घेतल्यामुळे रविवारी शहर परिसरात इंद्रधनुष्याचे दर्शन घडले. झाडशहापूरनजीकच्या परिसरात इंद्रधनुष्य दिसल्याने ते फोटोत कैद करण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती. पाऊस कमी झाल्याने रविवारी शेतकऱयांनी शेतावर जाऊन शेतातील पाणी काढण्यासह इतर कामे केली.