प्रतिनिधी / बेळगाव
सुटीचा दिवस आणि येऊ घातलेल्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मांसाहाराला अधिक पसंती दर्शविल्याचे दिसून आले. चिकन, मटणशॉप बरोबरच फिश मार्केटमध्ये ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी दिसून आली. येत्या शनिवारी घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घराची स्वच्छता केली जाते. या काळात मांसाहार वर्ज्य केला जातो. यामुळे रविवारी सुटीच्या दिवशी घरोघरी तसेच मित्रपरिवाराकडून मांसाहाराचा बेत आखत चिकन, मटणाबरोबरच बांगडय़ांवर ताव मारण्यात आला.
मटणचा चरबीयुक्त दर 600 रु. किलो, चरबीविरहीत मटणाचा दर 640 आहे. चिकनचा दर 200 ते 210 रु. किलो असल्याचे दिसून आले. रविवारी चिकन-मटण खरेदीला जोर आल्याचे दिसून आले. कोरोना आणि लॉकडाऊनच्या दरम्यान चिकन-मटणाला चांगला भाव आला असून दरही वाढले आहेत. याशिवाय कोरोनासाठी ‘अंडे का फंडा’ची अंमलबजावणी केल्याने अंडय़ांचा डझनाचा भाव 70 ते 72 रु. आहे.
रविवारी मासळी बाजारात बांगडय़ांचा दर 160 ते 200 असल्याचे दिसून आले. पुढील आठवडय़ापासून मांसाहार वर्ज्य असल्याने बांगडय़ांची खरेदी मोठय़ा प्रमाणात झाली. सुरमई 400 ते 450 रु. किलो, पापलेट 400 रु. किलो, कोळंबी 400 रु. किलो, सौंदाळ मासा 160 ते 180 रु. किलो, रावस 160 रु. किलो, राणी मासा 140 रु. किलो अशा दराने माशांची विक्री सुरू होती.