नागरिकांनी सावध होण्याची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. दररोज हजारचा टप्पा ओलंडत आहे. ही खरोखरच धोक्याची घंटा आहे. कोरोनाग्रस्तांची वाढत चाललेली ही आकडेवारी पाहून तरी प्रत्येकाने सावध होणे गरजेचे आहे. अन्यथा हा आकडा दुप्पटीने वाढण्याची भीती आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. रविवारी तब्बल 1331 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे आरोग्य विभागावर आणखी ताण पडला आहे.
रविवारी तालुक्यामध्ये 398 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये शहरातील 277 तर ग्रामीण भागातील 121 जणांचा समावेश आहे. तालुक्यामध्येही मोठय़ा प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. ग्रामीण भागापेक्षा हा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. ज्या गावांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्या गावांमध्ये स्वतःहूनच ग्राम पंचायत लॉकडाऊन सारखा पर्याय अवलंबताना दिसत आहे.
तरीदेखील हा आकडा वाढत असल्यामुळे भीतीचे वातावरण पसरत आहे.
कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाने सर्व ती खबरदारी घेतली आहे. मात्र, जनतेनेही याबाबत अधिक काळजी घेणे गरजेचे झाले आहे. कारण हा आकडा वाढत चालला तर सर्वांनाच मोठा धोका निर्माण होणार आहे. गेल्या काही दिवसापासून दररोज हजारपेक्षा अधिक रुग्ण वाढत आहेत.
चार दिवसांपूर्वी तर तब्बल 1600 रुग्ण आढळले होते. त्यामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले. सध्या 6380 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र असाच आकडा वाढत राहिला तर मोठा धोका निर्माण होणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाने मृत्यू होण्याची संख्या वाढली आहे. शनिवारी कोरोनाने दोघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 370 जणांचा मृत्यू झाल्याचा अहवाल आरोग्य खात्याने दिला आहे. तेव्हा आता प्रत्येकानेच काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
रविवारी शहरातील सहय़ाद्रीनगर, बसव कॉलनी, आदर्शनगर, अंजनेय नगर, आनंदनगर, अनंतशयन गल्ली, अनगोळ, शिंदोळी, आझमनगर, बसवण कुडची, भाग्यनगर, बॉक्साईट रोड, शहापुर, कॅम्प, चव्हाट गल्ली, चन्नम्मानगर, गेंधळी गल्ली, गुड्सशेड रोड, हनुमाननगर, हिंदवाडी, खडेबाजार, काळी आमराई, कोनवाळ गल्ली, कोरे गल्ली, कुमारस्वामी लेआऊट, महांतेशनगर, महाद्वार रोड, माळमारुती, शाहूनगर, सदाशिवनगर, शास्त्रीनगर, रामतीर्थनगर, शिवाजीनगर, श्रीनगर, ताशीलदार गल्ली, टीचर कॉलनी, टिळकवाडी, वडगाव, वंटमुरी कॉलनी, विनायकनगर, यमनापूर, यांसह इतर भागांमध्ये रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातील आंबेवाडी, बंबरगा, बस्तवाड, कंग्राळी बी. के., काकती, सांबरा, हिंडलगा, मुतगा, हंगरगा, हिरेबागेवाडी, होनगा, कडोली, बसरीकट्टी, मच्छे, पिरनवाडी, सावगाव, अलतगा, तारिहाळ, येळ्ळूर, चंदूर, यांसह इतर गावांमध्ये रुग्ण आढळले आहेत.