सिडनी
कोरोना व्हायरस महामारीमुळे संपूर्ण जग ठप्प झाले आहे. जागतिक स्तरावरील सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर किंवा रद्द झाल्याने विविध क्रीडाप्रकारातील खेळाडूंना आपला वेळ आपल्या घरीच घालवावा लागत आहे. अशा स्थितीमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगने सोशल मीडिया माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत आहेत. हॉगने रवींद्र जडेजाला सर्वोत्तम भारतीय क्षेत्ररक्षकाची पसंती दिली आहे. काही क्रिकेट शौकिनांनी हॉगशी ट्विटरद्वारे संपर्क साधत भारताचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कोण आहे, असा प्रश्न केला. विराट कोहली, रवींद्र जडेजा, युवराज सिंग आणि सुरेश रैना हे भारताचे सर्वोत्तम चार क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जातात पण हॉगने रवींद्र जडेजाला सर्वोत्तम भारतीय क्षेत्ररक्षक म्हणून पसंती दिली आहे. रवींद्र जडेजाला मध्यंतरी दुखापतीची समस्या जाणवत होती पण या समस्येतून तो आता पूर्णपणे तंदुरूस्त झाला आहे.
आता तो नियमितपणे व्यायामावर भर देत आहे. जडेजा हा केवळ क्रिकेटपटू नसून तो कुशल उद्योगपती म्हणूनही ओळखला जातो.