3 कोटी 80 लाख रुपये किंमत
रशियाच्या एका अब्जाधीशाची ‘फी’ नावाची सुपरयाट मंगळवारी लंडनमध्ये जप्त करण्यात आली आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावरून ब्रिटन सरकारच्या निर्बंधांच्या अंतर्गत ही सुपरयाट ताब्यात घेण्यात आली आहे. राष्ट्रीय गुन्हे यंत्रणेच्या (एनसीए) नव्या कॉम्बॅटिंग क्लेप्टोक्रेसी सेलच्या अधिकाऱयांनी कॅनेरी वार्फ येथे उभ्या असलेल्या सुपरयाटला जप्त करण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती दिली आहे.
गुप्तचर अधिकाऱयांच्या जलद कामगिरीमुळे जहाजाच्या मालकाची ओळख पटविण्यात आली आणि जहाजावर निर्बंध लादण्याची शिफारस करण्यात आली होती. ‘फी’ सुपरयाट जप्त करून आम्ही रशियासोबतच्या संबंधांचा लाभ घेत असलेल्या लोकांच्या विरोधात कठोर कारवाई करू शकतो हे सिद्ध करून दाखविले असल्याचे उद्गार ब्रिटनचे परिवहन मंत्री ग्रँट शाप्स यांनी काढले आहेत.
रशियाच्या अज्ञात उद्योजकाची मालकी असलेल्या फी या सुपरयाटची निर्मिती रॉय ह्यूसमॅन या कंपनीकडून करण्यात आली होती. जहाजाचा मालक कोण हे जाणूनबुजून गुप्त ठेवण्यात आल्याचे शाप्स यांनी म्हटले आहे. ब्रिटनच्या सरकारने रशियाच्या सरकारचे प्रतिनिधी, उद्योजक आणि अब्जाधीशांच्या मालमत्ता जप्त केल्या तसेच त्यांच्यावर प्रवासबंदी लादली आहे.