ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, शस्त्रास्त्रनिर्मिती क्षेत्राशी संबंधित करार होणार
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 6 डिसेंबर रोजी भारताच्या दौऱयावर येणार आहेत. ते 21 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही या शिखर परिषदेत सहभागी होणार असून यावेळी द्विपक्षीय चर्चा होणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. विशेष राजनैतिक भागिदारी आणि संबंध सुधारण्याबाबत दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, ते जी-20 पासून ब्रिक्स आणि शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (एससीओ) या आंतरराष्ट्रीय अजेंडा अंतर्गत केलेल्या सामायिक कार्याचा आढावा घेतील, अशी माहितीही देण्यात आली.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 6 डिसेंबरला अत्यंत छोटय़ा पण महत्त्वाच्या दौऱयावर भारतात येत आहेत. अवघ्या काही तासांच्या या भेटीमध्ये भारत आणि रशिया यांच्यातील संबंध पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर ऊर्जा ते अंतराळ तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रनिर्मिती क्षेत्राशी संबंधित जवळपास डझनभर करार होणार आहेत. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष पुतीन दुपारी दिल्लीला पोहोचतील आणि ते फक्त 6-7 तास भारतात असतील. मात्र, या काळात दोन्ही देशांमध्ये विविध पातळय़ांवर जोरदार चर्चेची फेरी होणार आहे. दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये सायंकाळी साडेपाच वाजता दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. यादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष आणि अनौपचारिक चर्चेचे सत्रही होणार आहे. कोरोनाचे ओमिक्रॉन प्रकार आणि कोविड प्रोटोकॉलमुळे निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील या संभाषणातील अधिकाऱयांची संख्याही अत्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. पुतीन सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्हा रशियाला परतणार आहेत.
‘टू प्लस टू’ चर्चा
भारत आणि रशियाच्या परराष्ट्र-संरक्षण मंत्र्यांमध्ये 6 डिसेंबर रोजी ‘टू प्लस टू’ चर्चा आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहतील. तर, रशियाच्यावतीने परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव आणि संरक्षणमंत्री सर्गेई शोइंगू उपस्थित राहणार आहेत. रशियाचे हे दोन्ही मंत्री रविवारी भारतात दाखल झाले आहेत. यादरम्यान दोन्ही देशांचे मंत्री आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थिती आणि अफगाणिस्तान-सीरियामधील घडामोडी यासह प्रमुख प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर सखोल चर्चा करतील.