वर्षभरात 85 कोटी डोस तयार करणार कंपनी- कोरोनाविरोधी युद्धात मोठी मदत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना महामारीमुळे भारतात बिघडत चाललेल्या स्थितीदरम्यान अनेक देश मदतीसाठी सरसावले आहेत. अमेरिकेने लसीसाठी आवश्यक कच्चा माल पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. तर ब्रिटन आणि फ्रान्सकडून ऑक्सिजन कंसंट्रेटर येत आहेत. याचदरम्यान रशियामधून एक चांगली बातमी समोर आली आहे. भारताला रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीची पहिली खेप 1 मे रोजी मिळणार आहे.
देशात अचानक निर्माण झालेली लसींची टंचाई पाहता भारत सरकारने स्पुतनिक-व्ही ला मंजुरी दिली होती. लसींचे उत्पादन आणि प्रचाराचे काम रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) कंपनी करत आहे. आरडीआयएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरिल दिमित्रिएव यांनी सध्या भारतात दर महिन्याला 5 कोटी डोस तयार केले जाणार असल्याची माहिती दिली आहे.
उन्हाळा संपल्यावर कंपनी उत्पादनाचे प्रमाण आणखीन वाढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. भारताच्या 5 मोठय़ा लस उत्पादकांसह एक वर्षात 85 कोटी डोस तयार करण्याचा करार आरडीआयएफने केला आहे.
स्पुतनिक-व्ही निर्माण करणाऱया गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने कोरोनाशी लढण्यास लस 95 टक्के उपयुक्त असल्याचा दावा केला आहे. परीक्षणात लसीचा पहिला डोस देण्यात आल्याच्या 28 दिवसांनी 91.4 टक्के प्रभावोत्पादकता दिसून आली. पहिल्या डोसच्या 42 दिवसांनी हे प्रमाण वाढून 95 टक्के झाले. लसीचे दोन्ही डोस 39 बाधितांसह 18,794 अन्य रुग्णांना देण्यात आले होते. रशियाच्या नागरिकांसाठी ही लस मोफत उपलब्ध आहे. जगातील अन्य देशांसाठी याची किंमत 700 रुपयांपेक्षा कमी निश्चित करण्यात आली आहे. स्पुतनिक-व्ही ची संभाव्य किंमत अन्य लसींच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.