युक्रेनच्या शरणार्थीना करणार मदत
नोबेल शांतता पुरस्कार विजेते रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह यांनी युक्रेन शरणार्थींसाठी स्वतःच्या नोबेल पुरस्काराचा लिलाव करून निधी उभारणार असल्याची घोषणा केली आहे. मुराटोव्ह सध्या रशियाच्या ‘नोवाया गजेटा’ वृत्तपत्राचे मुख्य संपादक आहेत. मुराटोव्ह यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणाच्या प्रयत्नांसाठी मारिया रेसा यांच्यासोबत संयुक्त स्वरुपात 2021 नोबेल शांतता पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
नोवाया गजेटा आणि मी युक्रेनच्या शरणार्थी निधीत 2021 च्या नोबेल शांतता पुरस्काराचे पदक दान करण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनचे 1 कोटींहून अधिक लोक शरणार्थी झाले आहेत. या प्रसिद्ध पुरस्काराला लिलावासाठी ठेवा असे आवाहन मुराटोव्ह यांनी लिलाव कंपन्यांना केले आहे.
रशियाने 24 फेब्रुवारीपासून युक्रेनवर युद्ध लादले आहे. रशियाने स्वतःच्या शेजारी देशात हजारो सैनिक पाठविले आहेत. 27 दिवस उलटूनही युद्ध शमण्याची चिन्हे अद्याप दिसून येत नाहीत. रशियाच्या हल्ल्यांमुळे युक्रेनमधील शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. दोन्ही देशांचे मोठय़ा संख्येत सैनिक तसेच नागरिक या युद्धात मारले गेले आहेत.
रशियाचे संरक्षण मंत्रालय क्रेमलिनवर मुराटोव्ह यांनी टीका केली आहे. 5 गोष्टी त्वरित करण्याची गरज आहे, युद्ध बंद करा, कैद्यांची अदलाबदली करा, मृतांचे मृतदेह सोडा, मानवी कॉरिडॉर तयार करून सहाय्य प्रदान करा आणि शरणार्थींना मदत पुरवा असे मुराटोव्ह यांनी नोवाया गजेटा या वृत्तपत्रातील लेखात नमूद केले आहे.
रॅप्पलर या वृत्त संकेतस्थळाच्या सह-संस्थापिका फिलिपाईन्समधील मारिया रेसा यांच्यासोबत संयुक्त स्वरुपात मुराटोव्ह यांनी नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त केला होता. वृत्तपत्रीय कामकाजादरम्यान हत्या झालेल्या 6 पत्रकारांना त्यांनी हा पुरस्कार समर्पित केला होता.