घरोघरी ऐकविली जातेय चारकोलची कहाणी
रशिया विरोधी युद्धात युक्रेनच्या महिला देखील महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. युक्रेनच्या सैन्याकडून मोठय़ा संख्येत महिला रशियाच्या सैनिकांना भिडत आहेत. याचपैकी एक आहे ‘चारकोल’ नावाने प्रख्यात युक्रेनियन महिला शार्प शूटर. तिचे वैयक्तिक आयुष्य आणि ओळख तिच्या सुरक्षेसाठी गोपनीय ठेवण्यात आली आहे. तरीही युद्धाच्या आघाडीवर तिच्या साहसाची कहाणी युक्रेनच्या घराघरात ऐकविली जात आहे. युक्रेनमध्ये तिला एका ‘नायिके’प्रमाणे पाहिले जात आहे.
राष्ट्रीय नायिका
‘चारकोल’ नावाने प्रसिद्ध युक्रेनची ही महिला स्नायपर युद्धभूमीवर पुरुष सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे. युक्रेनवर हल्ला करणो लोक माणूस म्हणवून घेण्याच्या योग्यतेचे नाहीत, ते फॅसिस्ट आहेत, आम्हाला त्यांना पळवून लावावेच लागणार असे या महिला स्नायपरने म्हटले आहे.
पुन्हा हाती घेतले शस्त्र
युक्रेनची ही स्नायपर 2017 पासूनच रशिया समर्थक फुटिरवाद्यांशी लढत होती. चालू वर्षाच्या प्रारंभी तिने सैन्याच्या सेवेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रशियाच्या आक्रमणानंतर स्वतःच्या देशाच्या सुरक्षेसाठी तिने पुन्हा एकदा शस्त्र हाती घेतले आहे.
लेडी डेथशी होतेय तुलना
स्वतःच्या स्नायपरचे साहस पाहून युक्रेनच्या लोकांनी तिची तुलना दुसऱया महायुद्धातील बहुचर्चित स्नायपर ‘लेडी डेथ’शी करू लागले आहेत. दुसऱया महायुद्धात लेडी डेथ नावाने प्रसिद्ध स्नायपर ल्यूडमिला पावलिचेंको यांनी 300 हून अधिक नाझी सैनिकांना स्वतःच्या गोळय़ांनी ठार केले होते.
रशियन महिला स्नायपर जेरबंद
काही दिवसांपूर्वी युक्रेनच्या सैन्याने युद्धग्रस्त डोनबासमधून रशियन सैन्याच्या सर्वात क्रूर स्नायपर इरीना स्टारिकोव्हा यांना जेरबंद केले होते. स्टारिकोव्हा यांच्यावर 40 हून अधिक युक्रेनियन सैनिकांच्या हत्येचा आरोप होता.
महिला स्नायपरांचे प्रमाण मोठे
पूर्वीच्या सोव्हियत महासंघाच्या भागांमध्ये आधीपासूनच महिला स्नायपरांचे प्रमाण अधिक राहिले आहे. ‘लेडी डेथ’ यांच्यासह 100 हून अधिक नाझींना ठार करणाऱया 17 वर्षीय स्येलिजावेटा मिरोनोव्ह यासारख्या स्नायपरांचे किस्से येथे सांगितले जातात. सध्या सुरू असलेल्या युद्धातही दोन्ही देशांकडून मोठय़ा संख्येत महिला शार्प शूटर्स परस्परांच्या सैनिकांना लक्ष्य करत आहेत. रशियात महिला स्नायपर्स तयार करण्यासाठी मॉस्कोनजीक रितसर प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यात आले आहे.