ऑनलाईन टीम / किव्ह :
रशिया आणि युक्रेनमध्ये मागील 23 दिवसांपासून सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. या युद्धाची धग अधिक तीव्र झाली असून, सर्वसामान्य नागरिकही या युद्धाचे शिकार बनत आहेत. यंग थिएटरची प्रसिद्ध अभिनेत्री ओक्साना श्वेट्स हीचा देखील किव्हमध्ये रशियन सैन्याच्या गोळीबारात मृत्यू झाला आहे. मृत्यूसमयी तिचे वय 67 वर्ष होते.
ओक्साना यांच्या निधनाची पुष्टी करत यंग थिएटरने एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये असं लिहिलंय की, ‘किव्हमधील निवासी इमारतीवर झालेल्या गोळीबारात, युक्रेनच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री ओक्साना श्वेट्स यांचा मृत्यू झाला आहे.’
ओक्साना यांचा युक्रेनच्या सन्मानित कलाकार या देशाच्या सर्वोच्च कलात्मक पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. त्यांनी इव्हानफ्रॅंको थिएटर आणि किव्ह स्टेट इन्स्टिटय़ूट ऑफ थिएटर आर्टसमध्ये शिक्षण घेतले. याशिवाय त्यांनी टेनौपिल म्युझिक ऍन्ड ड्रामा थिएटर आणि किव्ह थिएटर ऑफ सॅटायरमध्येही काम केले होते.
रशियानं युक्रेनच्या वेगवेगळय़ा भागात हल्ले करून युपेनच्या सैन्याला जेरीला आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अजूनही युक्रेनची राजधानी किव्ह सर करणं रशियन फौजांना शक्य झालेलं नाही. राजधानी किव्हवर रशियन सैन्याकडून सातत्याने हल्ले सुरू आहेत.