भारतात ‘डॉ. रेड्डीज लॅब’कडून उत्पादन- कोव्हिशिल्ड-कोव्हॅक्सिननंतर आता तिसरी लस उपलब्ध
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाला बळ देणारी दिलासादायी बातमी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला समोर आली आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिननंतर आता आणखी एका लसीला मंजुरी मिळाली आहे. रशियाची कोरोना लस ‘स्पुतनिक-व्ही’च्या आपत्कालीन वापरास सरकारने मान्यता दिली आहे. या लसीच्या मंजुरीमुळे, लस वापरकर्त्यांसाठी आणखी एक लस उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे कोरोनाविरुद्ध लसीकरण मोहीम वेगवान होण्यास मदत होईल. जगात विविध देशात ही लस वापरण्यात येत आहे. या लसीची परिणामकारता 90 टक्क्मयांच्या आसपास आहे. त्यामुळे सकारात्मक वैद्यकीय अहवालाअंतीच भारतातही या लसीला ही मंजुरी मिळाली आहे.
रशियाच्या गामालय सेंटरने ‘स्पुतनिक-व्ही’ ही लस विकसित केली आहे. या लसीची निर्मिती भारतातील फार्मा सेक्टर कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून केली जात आहे. या कंपनीने गेल्या सहा महिन्यांपूर्वीच अँटिव्हायरल लस ‘स्पुतनिक-व्ही’ ला लवकरच भारतात मंजुरी मिळू शकेल अशी आशा व्यक्त केली होती. ‘स्पुतनिक-व्ही’ लसीच्या वापरासाठी केंद्रीय मंत्रालयाने परवानगी दिली असून औषध नियामक कार्यालयाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सध्या मर्यादित वापरासाठी ही परवानगी देण्यात आली आहे.
‘स्पुतनिक-व्ही’ ही लस डॉ. रेड्डी लॅबला देणार असल्याचे रशियाने म्हटले आहे. ‘स्पुतनिक-व्ही’ या लसीचे 10 कोटी डोस डॉ. रेड्डी लॅबला देणार असल्याचे रशियाने स्पष्ट केले आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमधल्या सरकारी संशोधन केंद्रात अर्थात गामालेया इन्स्टिटय़ूट इथे ही लस तयार करण्यात आली आहे.
‘डॉ. रेड्डीज लॅब’शी सामंजस्य करार
रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडाने या लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी तसेच वितरणासाठी सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि डॉ. रेड्डीज लॅब यांच्यात सामंजस्य करार झाला असून, भारतात लसीचे 30 कोटी डोस तयार करण्यात येतील. डॉ. रेड्डीज लॅब ही देशातील अग्रगण्य फार्मा कंपन्यांपैकी एक आहे.
साईड इफेक्ट होत नसल्याचा दावा
रशियातील शास्त्रज्ञांनी ‘द लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकात लसीच्या संशोधनाबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. चाचणीत सहभागी झालेल्या लोकांच्या शरीरात योग्य वेळेत कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार झाल्या. तसेच या चाचणीमुळे कुठलेही गंभीर साईड इफेक्ट झाले नसल्याचा दावा रशियन शास्त्रज्ञांनी केला आहे.