2013 वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर भारतात प्रथमच जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
चेन्नई / वृत्तसंस्था
44 वी ‘चेस ऑलिम्पियाड’ स्पर्धा या वर्षाच्या दुसऱया टप्प्यात चेन्नईत आयोजित केली जाणार आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलियन यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, ही स्पर्धा रशियामध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर ही स्पर्धा भारतात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेने ही स्पर्धा भारतात होत असल्याबद्दल आपल्या ट्वीटर हँडलवरुन आनंद व्यक्त केला. यापूर्वी, यंदाची ही स्पर्धा दि. 26 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत मॉस्कोमध्ये होणे अपेक्षित होते.
अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेने यापूर्वी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी 70 कोटी रुपयांची तरतूद करण्याची हमी दिली होती. चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत 190 देशांचा सहभाग असतो आणि ही स्पर्धा साधारणपणे दोन आठवडे चालते.
चेस ऑलिम्पियाड स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन गटातून 11 फेऱयांमध्ये होणार असून यात 2 हजारपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणे अपेक्षित आहे. ही सांघिक स्पर्धा असून प्रत्येक संघात 5 खेळाडू व एक ट्रेनरचा समावेश असेल.
जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाचे सर्व खेळाडू या स्पर्धेत सहभागी होण्यास प्रथम प्राधान्य देत आले असून वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन नॉर्वेकडून सातत्याने खेळत आला, हे याचे उत्तम उदाहरण आहे. यापूर्वी मागील ऑलिम्पियाड ऑनलाईन खेळवली गेली, त्यावेळी भारतीय संघ संयुक्त विजेता ठरला होता.
यंदा भारतीय संघाचे नेतृत्व विश्वनाथन आनंदकडे असून पी. हरिकृष्णा व विदित गुजराथी हे त्याचे सहकारी असतील, हे निश्चित आहे. संघातील आणखी दोघे खेळाडू कोण असतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संघनिवडीबाबत अंतिम निर्णय घेण्याची दि. 1 मे पर्यंत मुदत आहे.
महिला गटात कोनेरी हम्पीकडे नेतृत्व असून डी. हरिका, आर. वैशाली यांचा सहभाग जवळपास निश्चित आहे. अन्य दोन जागांसाठी तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी यांच्यासह आणखी काही ग्रँडमास्टर्समध्ये स्पर्धा असेल. यजमान या नात्याने भारताला अतिरिक्त संघ उतरवण्याची संधी असणार आहे. त्यामुळे दोन्ही गटातून कनिष्ठ खेळाडूंचा समावेश असणारा ब संघ खेळेल.
रशियाचे यजमानपद हुकले
रशियाने शेजारी राष्ट्र युपेनवर हल्ला केल्यानंतर त्यांना फर्स्ट चेस ऑलिम्पियाड या दिव्यांगांच्या बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपदही गमवावे लागले आहे. याशिवाय, 93 वी फिडे काँग्रेस देखील रशियात होणार नसल्याचे जाहीर केले गेले आहे.
चेस ऑलिम्पियाडमुळे 9 वर्षांच्या कालावधीनंतर भारतात प्रथमच एखादी जागतिक दर्जाची बुद्धिबळ स्पर्धा होईल, हे सुस्पष्ट झाले. यापूर्वी, 2013 मध्ये भारतीय भूमीत विश्वनाथन आनंद व मॅग्नस कार्लसन यांच्यात वर्ल्ड चॅम्पियनशिप लढतीचे आयोजन केले गेले होते.