युरो चषक फुटबॉल स्पर्धा – ऍलेक्सेईचा एकमेव गोल
सेंट पीटर्सबर्ग / वृत्तसंस्था
ऍलेक्सेई मिरान्शूकने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर यजमान रशियाने युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील साखळी सामन्यात 1-0 अशी बाजी मारली. पहिल्या सत्रातील स्टॉपेज टाईममध्ये ऍलेक्सेईने गोलजाळय़ाचा वेध घेतला आणि हा या सामन्यातल एकमेव गोल ठरला.
‘प्ले-मेकर’ ऍलेक्सेईने सहकारी स्ट्रायकर अर्तेम दिझुबाच्या साथीने उत्तम समन्वय साधत बॉक्सच्या दिशेने आगेकूच केली आणि मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रुपांतर करत संघाला पूर्ण 3 गुण वसूल करुन दिले. रशियन कर्णधार झिकियाला या लढतीत यलो कार्डला सामोरे जावे लागले.
फिनलंडने मागील 6 सामन्यात 1 विजय, 3 पराभव, 2 ड्रॉ तर रशियाने 3 विजय, 2 पराभव व 1 ड्रॉ अशी कामगिरी केली आहे. त्याचेच प्रतिबिंब या लढतीत दिसून आले व अपेक्षेप्रमाणे रशियाने फिनलंडवर वर्चस्व गाजवले. रशियाचा मिडफिल्डर दिमित्री बॅरिनोव्ह या सामन्यात दुखापतग्रस्त झाला व त्याला प्रथमोपचार घ्यावे लागले.